Join us

सिनेमात लीड रोलची दिली ऑफर, माजी मुख्यमंत्र्याच्या लेकीला फसवलं; ४ कोटी हडपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 12:26 IST

या निर्मात्यांनी आरूषीला जर या सिनेमात ५ कोटी रुपये गुंतवणूक केली तर या सिनेमाच्या मुख्य अभिनेत्रीची भूमिका देण्यासोबतच सिनेमाच्या एकूण नफ्यापैकी २० टक्के हिस्सा देण्याची ऑफर दिली.

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची अभिनेत्री मुलगी आणि फिल्म निर्माता आरूषी निशंकची मुंबईतल्या २ निर्मात्यांनी फसवणूक केल्याचं समोर आले आहे. मानसी वरूण बागला आणि वरूण प्रमोद कुमार बागला यांनी आरूषीची ४ कोटीची फसवणूक करून तिचा मानसिक छळ आणि धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सध्या देहारादूनच्या कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

आरूषी निशंक ही तिची फिल्म निर्माता कंपनी हिमश्री फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून सिनेमा बनवण्याच्या क्षेत्रात काम करते. मुंबईतील २ निर्मात्यांनी या कंपनीचे कोट्यवधी रूपये हडप केल्याचा आरोप आहे. माहितीनुसार, दोन्ही आरोपी आरूषीच्या घरी आले आणि स्वत:ची ओळख मिनी फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर म्हणून केली. ते एक आंखो की गुस्ताखिया नावाचा सिनेमा करत होते. त्या सिनेमात शनाया कपूर आणि विक्रांत मैसी यांची मुख्य भूमिका होती. त्यात एक मुख्य अभिनेत्रीचा शोध घेतला जात होता. 

या निर्मात्यांनी आरूषीला जर या सिनेमात ५ कोटी रुपये गुंतवणूक केली तर या सिनेमाच्या मुख्य अभिनेत्रीची भूमिका देण्यासोबतच सिनेमाच्या एकूण नफ्यापैकी २० टक्के हिस्सा देण्याची ऑफर दिली. तसेच सिनेमातील भूमिका पसंत पडली नाही तर त्यांनी दिलेली सर्व रक्कम १५ टक्के व्याजासह परत करू असंही आश्वासन आरूषी निशंकला देण्यात आले. आरूषी या दोघांच्या जाळ्यात अडकली आणि तिने ९ ऑक्टोबर २०२४ रोजी एमओयू साईन केला. पुढील १० दिवसांनी आरूषीकडून २ कोटी घेण्यात आले. त्यानंतर वेगवेगळा दबाव टाकून, बहाणे करून ४ कोटी रुपये वसूल करण्यात आले.

दरम्यान, या दोघांनी आरूषीचं ना प्रमोशन केले ना, स्क्रिप्ट फायनल केली. अखेर आरूषीला फिल्ममधून बाहेर केले. जेव्हा आरूषीने गुंतवणूक केलेले पैसे पुन्हा मागितले तेव्हा फिल्मचं भारतातलं शूटिंग संपलं आहे आणि युरोपात शूटिंग सुरू आहे असं सांगत तिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्यात आल्याचं आरूषीला सांगण्यात आले. या निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर फिल्मचा फोटो शेअर केला त्यात आरूषीचा कुठेही उल्लेख केला नाही. जेव्हा आरूषीने दोघांकडे पैशाची मागणी केली तेव्हा तिला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. पोलिसांनी या प्रकरणी आता गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे. 

टॅग्स :सिनेमा