Join us

आता आपण पाकिस्तानबाबत मवाळ होऊया - राकेश रोशन

By admin | Updated: February 2, 2017 18:17 IST

उरीमध्ये 18 सप्टेंबरला दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईकव्दारे बदला घेतला. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 2 - पाकिस्तानने भारतीय चित्रपटांसाठी आपले दरवाजे उघडल्यानंतर भारतानेही पाकिस्तानबद्दलची आपली कठोर भूमिका मवाळ करावी असे मत बॉलिवूडचे निर्माते राकेश रोशन यांनी व्यक्त केले. त्यांच्या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असलेला काबिल चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित झाल्यानंतर राकेश रोशन यांनी हे मत व्यक्त केले. 
 
उरीमध्ये 18 सप्टेंबरला दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईकव्दारे बदला घेतला. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले. याचा चित्रपट क्षेत्रालाही फटका बसला. भारतामध्ये पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली तर, पाकिस्तानने आपल्या चित्रपटगृहांमध्ये बॉलिवूड चित्रपटांचे प्रदर्शन बंद केले. 
 
पाकिस्तानने जर एक पाऊल टाकले असेल तर, आपणही पुढे गेले पाहिजे असे रोशन म्हणाले. बुधवारी रात्री 11 वाजता पाकिस्तानात काबिल चित्रपटाचा खेळ झाला. कराचीमध्ये झालेला शो हाऊसफुल्ल होता. गुरुवारी कराची, रावलपिंडी, हैदराबाद (सिंध प्रांत) या भागात काबिल प्रदर्शित होणार आहे.