पुणेरी पाट्या या तर आता जगभरात प्रसिद्ध आहेतच. बरेच लोक पुणेरी पाट्यांवर जोक्स करतात, तर अगदी सोशल साईट्सवर बिनधास्तपणे या पाट्या सगळीकडे फिरताना दिसतात. पुण्यात आलेल्या माणसाला एकतरी भन्नाट पुणेरी पाटी दिसल्याशिवाय राहतच नाही. आता हे झाले पुणेरी पाट्यांबद्दल, या पुणेरी पाट्या काय कमी होत्या म्हणून त्यांच्या जोडीला आता चीटरच्या पाट्या येणार आहेत. या चीटरच्या पाट्या सगळीकडे झळकूदेखील लागल्या आहेत. सोशल नेटवर्किंग साईट्सवर तुम्ही काहीही टाका त्या गोष्टी लोकांपर्यंत अगदी क्षणार्धात पोहोचतात. असेच काही झाले आहे चीटरच्या या पाट्यांबद्दल. ऋषीकेश जोशींचा चीटर लुकमधील एक फोटो सध्या सोशल साईट्सवर झळकत असून, या फोटोच्या बाजूलाच एक पाटी तुम्हाला दिसेल. त्या पाटीवरचा मजकूर एवढा इंटरेस्टिंग अन् लक्षवेधी आहे की हे फोटो पाहताना त्या पाटीवर नजर गेल्याशिवाय राहतच नाही. तर त्या पाटीवर एका गाडीचे चित्र आहे अन् त्या गाडीच्या विंडोवर लिहिले आहे, मला एकदा पुसा नाहीतर विका. आता ही अस्सल पुणेरी भाषा आपल्याला चीटरच्या पाट्यांमध्ये देखील पाहायला मिळत आहे. या चीटरच्या पाट्या केवळ प्रमोशन पुरत्याच मर्यादित आहेत की, आपल्याला त्या चित्रपटातही पाहायला मिळणार हे तर लवकरच समजेल.
आता येणार ‘चीटर’च्या पाट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2016 01:13 IST