Join us
Daily Top 2Weekly Top 5

नितीन देसाईंनी आई वडिलांसाठी केली होती भावूक पोस्ट, म्हणाले, "माझं मोठं गिफ्ट..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 12:54 IST

नितीन देसाई यांनी केवळ २ हजार रुपयांपासून कमाईला सुरुवात केली होती.

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी काल आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांनी कष्टाने उभारलेल्या कर्जतच्या ND स्टुडिओतच गळफास घेतला. चित्रपटांमध्ये डोळे दिपवणारे भव्य सेट त्यांनी उभारले पण आयुष्याचा सेट मात्र मोडला. त्यांचं निधन मनाला चटका लावणारं आहे. आज नितीन देसाई आपल्यात नाहीत याचा इतरांनाच एवढा धक्का बसलाय तर त्यांच्या कुटुंबाची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करवत नाही. नितीन देसाई सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असायचे. त्यांनी आई वडिलांसाठी केलेली पोस्ट आता व्हायरल होत आहे.

नितीन देसाई यांनी केवळ २ हजार रुपयांपासून कमाईला सुरुवात केली होती. पॅशन आणि टॅलेंटने त्यांना ओळख मिळवून दिली. ते नेहमीच याचं श्रेय आईवडिलांना द्यायचे. तसंच आपलं नाव सांगताना ते नितीन चंद्रकांत देसाई असं संपूर्ण नावच घ्यायचे. 'मदर्स डे'ला त्यांनी आईसाठी एक पोस्ट केली होती. 

ते लिहितात, 'आई, आज मी जे काही आहे ते तुझ्यामुळेच. तुझ्यामुळेच मला रोज प्रेरणा मिळते. मला आतून आणि बाहेरुन फक्त तूच ओळखतेस. तू कल्पनाही करु शकत नाही इतकं मी तुझ्यावर प्रेम करतो. तू माझी सर्वात मोठी प्रेरणा आहेस. तू आजपर्यंत मला पाठिंबा दिलास आणि आज मी जो काही आहे तो तुझ्यामुळेच म्हणून तुझे खूप आभार. मातृदिनाच्या शुभेच्छा.'

तर १५ जून २०२१ रोजी त्यांनी वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला. यामध्ये ते वडिलांच्या हातात ट्रॉफी देताना दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये  ते लिहितात,'जेव्हा स्वप्न सत्यात उतरतात...वडिलांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास हेच त्यांनी मला दिलेलं सर्वात मोठं गिफ्ट आहे. ही ट्रॉफी मी त्यांना समर्पित करतोय. माझ्या संपूर्ण टीमचे आभार. लगानला २० वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करुया.'

दरम्यान नितीन देसाई यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं असाच प्रश्न सर्वांना पडलाय. त्यांच्यावर बऱ्याच कोटींचं कर्ज होतं. एनडी स्टुडिओवर कोणत्याही क्षणी जप्ती येणार होती. हे सर्व त्यांना सहन झालं नाही आणि त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला अशी माहिती समोर येत आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत.

टॅग्स :नितीन चंद्रकांत देसाईसोशल मीडियापरिवार