Join us

नवकलाकार बनले किराएदार, बहुतेकांची पसंती भाड्याच्या घरांना, सर्वाधिक भाडे १० लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 09:18 IST

Rented Houses: बॉलीवूडमधील दिग्गज मंडळींनी गेल्या काही महिन्यांत मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर मालमत्तांची खरेदी केली आहे. असे असले तरी आजही अनेक नवीन कलाकारांचा कल हा मुंबईत भाड्याच्या घरात राहण्याकडे असल्याचे दिसून येते.

मुंबई - अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरूख खान, अजय देवगण, काजोल अशा बॉलीवूडमधील दिग्गज मंडळींनी गेल्या काही महिन्यांत मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर मालमत्तांची खरेदी केली आहे. असे असले तरी आजही अनेक नवीन कलाकारांचा कल हा मुंबईत भाड्याच्या घरात राहण्याकडे असल्याचे दिसून येते. बांधकाम उद्योगातील एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार बॉलीवूडमध्ये येऊन पाच-सात वर्षांत स्थिरावू पाहणाऱ्या अनेक कलाकारांनी भाड्यांनी घरे घेतली आहेत. यापैकी काही कलाकार महिन्याकाठी १० लाख रुपयांपर्यंत भाडे देत आहेत. सुशांतसिंह राजपूतही वांद्रे येथे आलिशान फ्लॅटमध्ये भाड्याने रहायचा. तो महिन्याकाठी ४ लाख ७५ हजार रुपये भाडे भरत होता.

व्यावसायिक उंची, आर्थिक स्थितीनुसार घर खरेदीसिनेसृष्टीतील कलाकारांप्रमाणेच टीव्ही मालिकांत काम करणाऱ्या अभिनेते-अभिनेत्री यांनी जुहू, वर्सोवा, मीरा रोड, नालासोपारा येथे भाड्याने मोठ्या प्रमाणावर घरे घेतली आहेत. त्याकरिता महिन्याकाठी ७० हजार ते अडीच लाखांपर्यंत भाडे ते भरत आहेत.

नवीन कलाकारांचा जम बसेपर्यंत ते भाड्यानेच राहणे पसंत करतात. जम बसल्यानंतर त्यांच्या व्यावसायिक उंचीनुसार व आर्थिक स्थितीनुसार ते योग्य त्या ठिकाणी घर खरेदी करतात, असा कल असल्याचे विश्लेषणदेखील यामध्ये करण्यात आले आहे.

 अभिनेत्री क्रीती सेनॉन हिने अमिताभ बच्चन यांचा एक आलिशान फ्लॅट भाड्याने घेतला असून त्याकरिता ती महिन्याकाठी तब्बल १० लाख रुपये भाडे भरत आहे. या फ्लॅटकरिता तिने ६० लाख रुपयांचे डिपॉझिट दिले आहे. अभिनेत्री आदिती राव हिने अलीकडेच अभिनेत्री मलायका अरोरा हीचा फ्लॅट भाड्याने घेतला असून महिन्याकाठी २ लाख ३१ हजार रुपयांचे भाडे ती भरत आहे. अभिनेता कार्तिक आर्यन याच्या आईनेदेखील अभिनेता शाहिद कपूर याचा फ्लॅट अलीकडेच भाडे तत्वावर घेतला असून याकरिता महिन्याला साडेसात लाख रुपये भाडे त्या भरत आहेत. 

टॅग्स :मुंबईसुंदर गृहनियोजनबॉलिवूड