Join us

प्रेक्षकांना नवा ‘हीरो’ नकोसा!

By admin | Updated: September 14, 2015 23:11 IST

दोन बड्या स्टार्सच्या मुलांना रुपेरी पडद्यावर झळकावणाऱ्या सलमान खानच्या प्रॉडक्शन कंपनीचा ‘हीरो’ हा चित्रपट अपेक्षांच्या कसोटीवर उतरला नाही; तसेच बॉक्स आॅफिसवरही

दोन बड्या स्टार्सच्या मुलांना रुपेरी पडद्यावर झळकावणाऱ्या सलमान खानच्या प्रॉडक्शन कंपनीचा ‘हीरो’ हा चित्रपट अपेक्षांच्या कसोटीवर उतरला नाही; तसेच बॉक्स आॅफिसवरही फारसा यशस्वी होऊ शकला नाही. अनेक वायदे आणि दाव्यांसह प्रदर्शित करण्यात आलेल्या या चित्रपटाला पहिल्या तीन दिवसांत २० कोटी रुपयांचा गल्ला जमवता आला. पहिल्या दिवसाची कमाई ७ कोटींपेक्षा कमी राहिली. या चित्रपटातून आदित्य पांचोली यांचे पूत्र सूरज आणि सुनील शेट्टी यांची कन्या आथिया शेट्टी यांना रुपेरी पडद्यावर झळकाविण्यात आले. त्यांच्याबाबतीत कोणाचीही तक्रार नसली तरी निखिल अडवाणीचे दुबळे दिग्दर्शन आणि चित्रपटाच्या सुस्त गतीमुळे प्रेक्षकाच्या पदरी कमालीची निराशा आली. या चित्रपटाचे बजेट ३५ कोटींचे असल्याचा अंदाज आहे. तथापि, हा खर्च वसूल होईलच, याची शाश्वती वाटत नाही. या चित्रपटासोबत प्रदर्शित झालेला ‘तेरा मेरा टेढा मेढा’ आणि ‘द परफेक्ट गर्ल’ हे दोन चित्रपट यशस्वी झाले. २००७मधील वेलकम या चित्रपटाचा दुसरा भाग असलेला ‘वेलकम बॅक’ या चित्रपटाचा दुसरा आठवडाही चांगला राहिला. विनोदी ढंगातील या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत ५० कोटींची कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात हा आकडा ७५ कोटींवर गेला. हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्येही सामील होऊ शकतो, असा जाणकारांचा अंदाज आहे. ‘हीरो’च्या निराशाजनक कामगिरीमुळे या चित्रपटाला फायदा झाला. बजरंगी भाईजान या चित्रपटानंतरचा कबीर खान यांचा ‘फॅण्टम’ही बॉक्स आॅफिसवर फारसे काही करू शकला नाही. या चित्रपटाची कमाई ५८ कोटींवर स्थिरावली. पुढच्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या निखिल अडवाणी यांच्या ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात इम्रान खान आणि कंगना यांची जोडी आहे. तथापि, या चित्रपटाबाबतही फारशा आशा नाहीत.