मागील आठवड्यात प्रदर्शित झालेले सर्वच चित्रपट बॉक्स आॅफिसवर आपटले. या चित्रपटांपैकी सर्वात जास्त अपेक्षा हंसल मेहता यांच्या समलैंगिकतेवर आधारित ‘अलीगढ’ या चित्रपटापासून होत्या, पण मनोज वाजपेयी आणि राजकुमार राव यांच्या चांगल्या परफॉर्मन्सनंतरही हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर प्रभाव पाडू शकला नाही. पहिल्या आठवड्याअखेर ‘अलीगढ’ची कमाई १.५ कोटी रुपयांपेक्षाही कमी होती. दुसरीकडे ‘तेरे बिन लादेन’च्या सीक्वलला प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. या चित्रपटाचे पहिल्या तीन दिवसांचे उत्पन्न २ कोटींच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. ‘बॉलीवूड डायरीज’ची गत आणखी वाईट आहे. बॉक्स आॅफिसवर सध्या सोनम कपूरच्या ‘नीरजा’ने चांगले यश मिळविले आहे. पहिल्या आठवड्याअखेर २२ कोटींची धमाकेदार सुरुवात केल्यानंतर, दुसऱ्या आठवड्यानंतर चित्रपटाने ५० कोटींचा आकडा पार केला आहे. अशा चित्रपटासाठी ही फार मोठी बाब मानली जात आहे. यातील तज्ज्ञांच्या मतानुसार नीरजाला तोंडी प्रतिक्रियांचा खूप मोठा फायदा होत आहे. याशिवाय नव्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी कोणताच चित्रपट दमदार नसल्याने त्याचा फायदाही या चित्रपटाला मिळत आहे. अर्थात, आताही नीरजा शंभर कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करते का, याबाबत संभ्रम आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, चित्रपट ६० कोटींपर्यंत व्यवसाय करेल. येत्या शुक्र्रवारी प्रकाश झा यांचा प्रियांका चोप्रासोबतचा चित्रपट ‘जय गंगाजल’ प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. याशिवाय ‘जुबान’ हा चित्रपटही प्रदर्शित होत आहे. यात विकी कौशल आहे. हा चित्रपट पंजाबमध्ये चांगला व्यवसाय करेल, असा अंदाज बांधला जात आहे.
‘नीरजा’ची ५० कोटींची कमाई
By admin | Updated: March 1, 2016 02:57 IST