Join us
Daily Top 2Weekly Top 5

National Film Award: पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा कंगना राणौतने व्यक्त केला आनंद, प्रत्येकाचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 18:41 IST

कंगना राणौतने तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत.

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा यंदा उशिरा करण्यात आली. बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे.‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ आणि ‘पंगा’ या चित्रपटांसाठी कंगनाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर अभिनेता मनोज वाजपेयीला भोंसले चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. तर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार सुशांत सिंग राजपूतचा चित्रपट छिछोरेला मिळाला आहे. 

कंगना राणौतने तिला यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केल्यानंतर ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत. ती म्हणाली की, नुकतेच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत, त्यात मला मणिकर्णिका आणि पंगा चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. मणिकर्णिकाचे दिग्दर्शनही मी केले आहे. मी आमचे लेखक विजयेंद्र सर यांचे आभार मानते. प्रसून सर, म्युझिक डायरेक्टर शंंकर एहसान लॉयजी, निर्माते कमल जैनजी यांची मी आभारी आहे. तसेच पुनित गोएंकाजी यांनी आम्हाला खूप सहकार्य केले. संपूर्ण टीम, बॅकग्राउंड स्कोअर देणारे संचितजी, प्राइम फोकसचे नीरज, अंकिता आणि इतर कलाकार असे सर्वांचे आभार कंगनाने मानले आहेत. तसेच जर कुणाचे नाव घ्यायला विसरले असेल तर मला माफ करा, असेही तिने यात म्हटले आहे. ती पुढे म्हणाली की, या सर्वांनी सहकार्य केले आणि हा चित्रपट यशस्वी बनवला. हा पुरस्कार माझ्यासोबत शेअर करा प्लीज.

पंगा चित्रपटासाठी कंगनाने अश्विनी अय्यर तिवारी यांचे आभार मानले आहेत. तसेच या चित्रपटातील इतर सर्वांचेही तिने आभार मानले आहेत. याशिवाय तिने राष्ट्रीय पुरस्काराचे ज्युरी मेंबर, तिची फॅमिली आणि तिच्या टीमचे आभार मानले आहेत.

कंगना राणौतला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी तिला तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सर्वात आधी २००८ साली चित्रपट फॅशनसाठी कंगनाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर २०१४ साली क्वीन चित्रपटासाठी तिची सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. २०१४ नंतर २०१५ साली कंगनाने पुन्हा एकदा सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार तिला तनू वेड्स मनु रिटर्न्ससाठी मिळाला होता. आता चौथ्यांदा तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मणिकर्णिका चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

टॅग्स :कंगना राणौतराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018