ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - वि.वा. शिरवाडकर यांच्या लेखणीतून उतरलेले, रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेले 'नटसम्राट' हे नाटक आता चित्रपटाच्या रुपाने मोठ्या पडद्यावर येणार असून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यात 'नटसम्राट गणपतराव बेलवलकर' यांची प्रमुख भूमिका साकारणार आहेत. विशेष म्हणजे नाना पाटेकर यांच्या जन्मदिनी, म्हणजे नववर्षाच्या सुरूवातीस १ जानेवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून वाढदिवसानिमित्त नानाच त्यांच्या चाहत्यांना एक अनोखी भेट देणार आहेत.
'कुणी घर देता का घर' अशी हृदय हेलावणारी, आर्त साद घालत आप्पासाहेब बेलवलकर यांच्या वेदनेचा हुंकार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान नाना पाटेकर यांनी या चित्रपटात पेलले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला असून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.