महेश ठाकूर गेली अनेक वर्षं मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये काम करीत आहे. त्याने त्याच्या अभिनयातून आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे. त्याने अनेक मालिकांमध्ये काम करूनही कोणत्या एका व्यक्तिरेखेत तो अडकला नाही. प्रेक्षक त्याला त्याच्या कोणत्याही व्यक्तिरेखेच्या नावाने नव्हे, तर महेश ठाकूर म्हणूनच ओळखतात. नुकतीच ‘लोकमत’च्या आॅफिसला त्याने भेट दिली होती. त्या वेळी त्याने आजपर्यंतच्या त्याच्या कारकिर्दीविषयी ‘सीएनएक्स टीम’सोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. त्याने ‘सीएनएक्स’सोबत केलेली ही खास बातचीत.तुझ्या कारकिर्दीला आज अनेक वर्षे झाली आहेत. एक अभिनेता म्हणून तू स्वत:ला सिद्ध केले आहेस. तुझा हा इंडस्ट्रीतील प्रवास कसा सुरू झाला?मी लहानपणी सेंट्रल अमेरिकेत राहत होतो; पण तिथली पहिली भाषा ही स्पॅनिश असल्याने मला शिक्षणासाठी भारतात पाठवायचे, असे वडिलांनी ठरवले. त्यामुळे मी दहावीपर्यंत मुंबईत माझ्या आजीकडे राहिलो. कॉलेजसाठी मी अमेरिकेत गेल्यावर आजीची तब्येत बिघडली. त्यामुळे मी पुन्हा भारतात आलो. भारतात एखादे वर्ष राहायचे आणि पुन्हा अमेरिकेला जायचे, असे मी ठरवले होते. आमच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये पंकज धीर राहात असे. पंकजचा भाऊ जाहिरात क्षेत्रात होता. तो माझा खूप चांगला मित्र आहे. त्याने मला एकदा माझे काही फोटो द्यायाला सांगितले. ते फोटो त्याने जाहिरात कंपनीत दाखवले आणि मला पहिली जाहिरात मिळाली. केवळ काही फोटो काढण्याचे मला खूप सारे पैसे मिळाले होते. माझ्यासाठी हे सगळे काही अनपेक्षित होते. त्यानंतर मला जाहिराती मिळत गेल्या. जाहिरातीनंतर मला मालिकांच्या आॅफर्सही यायला सुरुवात झाली. ‘सैलाब’ या मालिकेमुळे मला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर मी कधीच मागे वळून पाहिले नाही.तू अभिनेता असण्याचा तुझ्या मुलांच्या आयुष्यावर काही प्रभाव पडतो का? मी नेहमीच माझ्या व्यवसायापासून माझ्या मुलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांनी माझे कामदेखील खूपच कमी प्रमाणात पाहिले आहे. खरे तर त्यांना हिंदी मालिका, चित्रपट पाहण्याची आवडच नाहीये. ‘जय हो’ या चित्रपटाच्या वेळेचा किस्सा तर कधीच न विसरणारा आहे. माझ्या मोठ्या मुलाला आर्यनला सलमान खान हा केवळ एक अभिनेता आहे एवढंच माहीत होते. त्याचे स्टारडम वगैरेची त्याला कल्पनाच नव्हती. तो माझ्यासोबत चित्रीकरणाला आला, त्या वेळी हे ऐकून सलमान खूप खूश झाला. सलमान आणि आर्यनची चांगलीच गट्टी जमली. त्याने त्याची छोटीशी बाईकही त्याला चालवायला दिली. माझी दोन्ही मुले माझ्यासोबत चित्रीकरणाला खूपच कमी वेळा येतात. सध्या मी ‘इश्कबाज’ या मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. ही मालिका तुम्ही पाहू नकाच, असे मी त्यांना सांगितले आहे. कारण, या मालिकेत माझ्या मुलांसोबतचे माझे नाते अतिशय वाईट आहे. मला एक प्रेयसीही दाखवलेली आहे. त्यामुळे या गोष्टी माझ्या मुलांनी पाहू नयेत, असे मला वाटते. त्या उलट माझे प्रत्येक काम माझी पत्नी पाहते. ती माझी सगळ्यात मोठी समीक्षक आहे. तुझ्या या २० वर्षांहून अधिक असलेल्या कारकिर्दीत छोटा पडदा किती बदलला आहे, असे तुला वाटते? मी सुरुवातीला मालिका करीत होतो. त्या वेळी केवळ दूरदर्शन ही एकच वाहिनी होती. त्यानंतर ‘झी वाहिनी’ आली. ‘झी’ वरील सगळ्या मालिकांमध्ये मिळून आम्ही २०-२५ जणच होतो. एखाद्याला एखादी भूमिका आॅफर आली आणि वेळेच्या अभावी ती भूमिका करणे शक्य नसेल, तर आम्ही एकमेकांची नावे त्या वेळी सुचवायचो. त्या वेळी स्पर्धा ही खूप कमी होती. एखाद्या अभिनेत्याला शोधणे हे तर निर्मात्यांसाठीही खूप कठीण असायचे. ‘तू तू मैं मैं’ या मालिकेच्या वेळी सचिन पिळगावकर यांना मला मालिकेत घ्यायचे होते; पण काही केल्या माझा नंबर त्यांना मिळत नव्हता. त्या वेळी मोबाईलही नसायचे. मी एका आॅडिशनला गेलो असता, तिथे आलेल्या एका अभिनेत्याने मला ‘सचिन तुम्हाला शोधत आहेत, तुमचा नंबर द्या’ असे सांगितले. मी नंबर दिल्यावर त्याच रात्री मला सचिन यांचा कॉल आला आणि ‘तू तू मैं मैं’ या मालिकेचा मी भाग बनलो. त्या वेळेचा काळच वेगळा होता. त्यानंतर एक-एक वाहिन्या येत गेल्या. तुम्हाला माहीत नसेल; पण ‘स्टार वाहिनी’ सुरू झाली, त्या वेळी त्या वाहिनीचा मी फेस होतो. मी ‘कौन बनेगा करोडपती’ या मालिकेच्या टीमसोबतही काम केले आहे. अमिताभ बच्चन सेटवर येण्याआधी हॉट सीटवर मी बसून लोकांना त्यांच्याशी कशाप्रकारे संवाद साधला जाईल, याचे प्रशिक्षण मी द्यायचो. एकदा माझे काम सुरू असताना अमिताभजी तिथे आले, आल्यावर हमारा काम आज आप कर रहे हो, असे म्हणत त्यांनी माझी फिरकीही घेतली होती. आज टीआरपी, सोशल मीडिया, टीव्ही मीडिया अशा अनेक गोष्टींचा छोट्या पडद्यावर प्रभाव आहे. आज टीआरपीनुसार मालिकांच्या कथा बदलल्या जातात. मला स्वत:ला आपल्या भारतीय मालिका पाहण्यापेक्षा परदेशी मालिका अधिक आवडतात. छोट्या पडद्यावर काम करीत असताना प्रेक्षक तुम्हाला त्याच व्यक्तिरेखेच्या नावाने ओळखतात. तुझ्याबाबतीत ही गोष्ट घडली आहे का? मला प्रेक्षक आजही महेश ठाकूर म्हणूनच ओळखतात. मी माझ्या कारकिर्दीत अनेक व्यक्तिरेखा साकारल्या; पण कोणत्याही व्यक्तिरेखेत मी अडकून राहिलो नाही, ही गोष्ट मला अधिक आवडते.मालिकांमध्ये नेहमीच अतिशय चांगल्या प्रियकराची, पतीची, मुलाची भूमिका मी आतापर्यंत साकारली आहे; पण ‘इश्कबाज’ या मालिकेत पहिल्यांदाच ग्रे शेड असलेली भूमिका मी साकारत आहे. या मालिकेतील माझा लूकही खूपच वेगळा आहे; पण प्रेक्षकांनी मला या नव्या व्यक्तिरेखेतही स्वीकारले आहे. मी कोणत्याही साच्यात अडकलो गेलो नाही, हे एक अभिनेता म्हणून माझ्यासाठी खूप चांगले आहे. तू अनेक वर्षे चित्रपटसृष्टीत आहेस, आजच्या चित्रपटांविषयी तुला काय वाटते? आजचे निर्माते हे नव्या चेहऱ्यापेक्षा स्टारसोबत काम करणे पसंत करतात. स्टारसोबत काम करताना काहीही झाले, तरी त्यांचे चित्रपट हिट होणार, याची त्यांना चांगली कल्पना असते. ते कोणत्याही पद्धतीचा धोका पत्करायला तयार नसतात. अनेकवेळा तर स्टारच्या मागणीनुसार ते पटकथेतही बदल करतात. या गोष्टी मला अजिबात पटत नाहीत. आजच्या काळात महेश भट, रामगोपाल वर्मा, निशिकांत कामत असे बोटावर मोजण्याइतकेच चांगले दिग्दर्शक आहेत. या दिग्दर्शकांचे चित्रपट हे नेहमीच्या पठडीतल्या चित्रपटांपेक्षा खूपच वेगळे असतात. मी चित्रपटात माझ्या व्यक्तिरेखेला अधिक महत्त्व देतो. चित्रपट चांगला असेल, तर भाषेचेही बंधन मी मानत नाही. मी ‘गेम प्लान’ नावाच्या एका बंगाली चित्रपटाचे नुकतेच चित्रीकरण केले आहे. व्यक्तिरेखा चांगली असेल, तरच मी चित्रपट करतो.
-prajakta.chitnis@lokmat.com