ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - स्टार प्लसवर लवकरच सुरू होणा-या 'नच बलिये'च्या नव्या पर्वात मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींप्रमाणे कुस्तीपटूही ठुमके लावताना दिसणार आहेत. या पर्वामध्ये महिला कुस्तीपटू गीता फोगट आणि तिचा पती पवन कुमार सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे.
कुस्ती क्षेत्रात आपलं नाव कमावणारी 'धाकड गर्ल' गीता आता डान्समध्ये दंगल करू शकणार की नाही?, हे कार्यक्रम सुरू झाल्यानंतर समजू शकणार आहे. गीता आणि तिच्या पतीला नच बलियेमध्ये सहभागी होण्यासाठी ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे.
गीता व्यतिरिक्त 'नच बलिये - 8' मध्ये दिव्यांका त्रिपाठी, भारती सिंह आणि करण पटेल सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, कुस्तीपटू गीता फोगट, बबीता फोगट आणि त्यांचे वडील महावीर सिंह फोगट यांच्या आयुष्यावर आधारित दंगल सिनेमा बनवण्यात आला. गीताने 2010 साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये कुस्तीमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते.
गीता-बबिताचे लहानपण ते गीताच्या कॉमनवेल्थ गेम्सपर्यंतचा फोगट कुटुंबीयांचा प्रवास या सिनेमात दाखवण्यात आला होता. यानिमित्ताने मोठ्या पडद्यावर फोगट कुटुंबीयांचं आयुष्य सर्वांना पाहायला मिळालं.