ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - लवकरच मोठ्या पडद्यावर तुम्हाला मुन्नाभाई आणि सर्किटची धम्माल जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. 'मुन्नाभाई एमबीबीएस-3' या सिनेमाची स्क्रिप्ट लिहून पूर्ण झाली आहे, अशी माहिती सर्किट म्हणजेच अभिनेता अर्शद वारसीने दिली. मुन्नाभाईच्या येणा-या तिस-या पार्टमध्ये सर्किटचा रोल साकारण्यासाठी खूपच उत्सुक असल्याचेही अर्शदने सांगितले.
'राजकुमार हिरानी यांनी माझ्याशी बातचित करुन मुन्नाभाई-3 या सिनेमाची कहाणी शानदार असून ती आजच्या काळातील सामाजिक मुद्यांशी संबंधित आहे', अशी माहिती अर्शदने आपला आगामी सिनेमा 'इरादा'चे प्रमोशन करताना दिली.
अभिनेता संजय दत्त यांच्या बायोपिकचं शुटिंग पूर्ण झाल्यानंतर, 2018 मध्ये 'मुन्नाभाई-3' सिनेमाचे शुटिंग सुरू करण्यात येईल, असेही अर्शदने सांगितले. सध्या राजकुमार हिरानी संजय दत्तच्या आयुष्यावरील आधारित सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. या सिनेमात संजय दत्तची भूमिका बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर साकारत आहे. तर संजय दत्तचे वडील आणि अभिनेते सुनील दत्त यांच्या भूमिकेत परेश रावल दिसणार आहे.
दरम्यान, संजय दत्तला स्वतःच्या बायोपिकमध्ये वडील सुनील दत्त साकारायची खूपच इच्छा होती. वडील संजय दत्त यांना आपल्याशिवाय कुणीही चांगले ओळखत नाही. त्यामुळे आपणच त्यांची भूमिका मोठ्या पडद्यावर योग्यरित्या साकारू शकतो, असे संजूबाबाचे म्हणणे होते. मात्र मोठ्या पडद्यावर रिअल संजय दत्त आणि रील संजय दत्त यादरम्यान प्रेक्षकांचा गोंधळ होऊन होऊ नये, म्हणून वडिलांची भूमिका साकारण्याचा विचार अखेर सोडून दिला.