Join us
Daily Top 2Weekly Top 5

'स्वोर्डस अँँड सेपटर्स' चित्रपटात अजिंक्य देव दिसणार या भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 17:33 IST

प्रसिद्ध इंडो-अमेरिकन अभिनेत्री देविका भिसेने 'स्वोर्डस अँँड सेपटर्स' चित्रपटात राणी लक्ष्मीबाईची प्रमुख भूमिका साकारली असून, या आंतरराष्ट्रीय चित्रपटात अजिंक्य देव, यतीन कार्येकर, नागेश भोसले, सिया पाटील आणि पल्लवी पाटील या मराठी चेहऱ्यांचा वावरदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. 

ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध भारतातील १८५७ च्या रणसंग्रामात असामान्य पराक्रम करणारी वीरांगणा म्हणून झाशीची राणी लक्ष्मीबाईचे नाव विख्यात आहे. 'झाशीची राणी' अशी ओळख असणाऱ्या या रणरागिणीच्या जीवनचरित्रावर 'स्वोर्डस अँँड सेपटर्स' नावाचा आंतरराष्ट्रीय सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरल्या गेलेल्या या ज्वलंत घटनेची दखल या सिनेमाद्वारे जागतिक पातळीवर घेतली जाणार आहे. भारतीय कलाशास्त्रज्ञ, प्रोफेसर, आणि भरतनाट्यम विशारद असलेल्या स्वाती भिसे यांनी या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. प्रसिद्ध इंडो-अमेरिकन अभिनेत्री देविका भिसेने यात राणी लक्ष्मीबाईची प्रमुख भूमिका साकारली असून, या आंतरराष्ट्रीय चित्रपटात अजिंक्य देव, यतीन कार्येकर, नागेश भोसले, सिया पाटील आणि पल्लवी पाटील या मराठी चेहऱ्यांचा वावरदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. 

मराठी चित्रपटसृष्टीचा गुणी अभिनेता अजिंक्य देवने या चित्रपटात तात्या टोपे यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमातील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अजिंक्य देव सांगतो, 'तात्या टोपे हे इतिहासातील खूप मोठे व्यक्तिमत्त्व आहे. शिवाय राणी लक्ष्मीबाईंच्या आयुष्यातील हे सर्वात महत्त्वाचे पात्रदेखील आहे. १८५७ च्या बंडामध्ये तात्या टोपे यांचा मोठा सहभाग होता. मला विश्वास आहे की, हा सिनेमा लोकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल'.

हा सिनेमा इंग्रजी भाषेमध्ये जरी असला तरी, यात थोड्याफार प्रमाणात मराठी आणि हिंदी भाषेचादेखील वापर करण्यात आला आहे.  या सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शिका स्वाती भिसे असे सांगतात की, 'राणी लक्ष्मीबाईचे जीवनचरित्र स्फुरण देणारे आहे. आजच्या स्त्रियांना त्यांची शौर्यगाथा आणि त्यांनी केलेला संघर्ष प्रेरणादायी ठरणारा आहे. कोणत्याही पुरुष पाठबळाशिवाय मुठभर सैनिकांना घेऊन बलाढ्य इंग्रजी सैन्यावर चालून गेलेली ही महिला जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा माझा मानस होता. त्यासाठी सर्वप्रथम, त्यांची शौर्यगाथा नाट्यसंगीतातून मांडण्याच्या मी विचारात होते. पण या ज्वलंत आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची गाथा जगातल्या प्रत्येक स्त्री-पुरुषांपर्यत पोहोचवण्यासाठी चित्रपटाचा मोठा पडदा महत्त्वाची भूमिका बजावेल, याची मला जाणीव झाली आणि त्यामुळेच हा सिनेमा बनवण्याचा मी विचार केला.'

टॅग्स :अजिंक्य देव