Join us

रेल्वे प्रवासात टीसीचे माझ्यासोबत वाईट वर्तन, मोहम्मद शमीच्या पत्नीची आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 09:13 IST

मोहम्मद शमीसोबतच्या वादामुळे हसीन जहाँ तिच्या मुलीसोबत वेगळी राहते. हसीन जहाँ ही व्यवसायाने अभिनेत्री असून, ती सध्या तिच्या बंगाली भाषेतील चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे

कोलकाता - भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याची पत्नी हसीन जहाँ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हसीन जहाँने यापूर्वी पती मोहम्मद शमीवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे, ती चांगलीच चर्चेत होती. आता, तिने रेल्वे प्रवासातील एका प्रसंगाचे वर्णन करत रेल्वेतील टीसीवर गंभीर आरोप केले आहेत. टीसीने आपल्यासोबत गैरवर्तन केले, आपल्याला झोपेतून उठवल्याचे तिने सोशल मीडिया अकाऊंटवरुन सांगितले आहे. 

मोहम्मद शमीसोबतच्या वादामुळे हसीन जहाँ तिच्या मुलीसोबत वेगळी राहते. हसीन जहाँ ही व्यवसायाने अभिनेत्री असून, ती सध्या तिच्या बंगाली भाषेतील चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतेच ती एका नातेवाईकाच्या लग्नासाठी रेल्वेने प्रवास करत होती, त्यावेळी रेल्वेती अधिकाऱ्याचा आलेला अनुभव तिने सोशल मीडियावर जाहीर केला आहे. नातेवाईकाच्या लग्नासाठी हसीन जहाँ बिहारला गेली होती. येथे विमानसेवा नसल्याने जोगबनी एक्सप्रेसमधून ती परतीचा प्रवास कोलकातासाठी करत होती. या प्रवासात माझे बर्थ सीट हे वर होते. मात्र, मी विनंती केल्यानंतर मला सहकारी प्रवाशाने खालची सीट देऊ केली. मात्र, मालदा स्टेशनवर रेल्वेगाडी आल्यानंतर टीसी माझ्या बर्थजवळ आले. त्यावेळी, माझ्याशी त्यांनी असभ्य भाषेत संवाद केला. तसेच, मला या सीटवरुन हटण्यास सांगितले, यावेळी माझा मोबाईलही फेकून देण्यात आल्याचे जहाँने सांगितले आहे. दरम्यान, याबाबत हसीनने तक्रार केल्यानंतर पोलिसांचे एक पथक फरक्का स्टेशनवर पोहोचले आणि त्यानंतर, पूर्ण सुरक्षेत हसीन कोलकात्याला पोहोचली. याबद्दल तिने पोलिसांचे आभारही मानले आहेत. मात्र, टीसीबद्दल रोष व्यक्त केला आहे. 

यापूर्वी पती मोहम्मद शमीवर आरोप 

मोहम्मद शमी मुलीसोबत गैरवर्तन करत असल्याचा गंभीर आरोप हसीन जहाँने केला होता. मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांच्यातील वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. आपल्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या मुलाखतीत मोहम्मद शमीबद्दल तिने गंभीर आरोप केले होते. शमीला आपल्या मुलीला भेटण्यात काहीच रस नाही. इतकंच नाही, तर मुलीसोबत वाईट वर्तन केल्याचा आरोपही तिने शमीवर केला होता. 

टॅग्स :रेल्वेमोहम्मद शामीइन्स्टाग्राम