Join us

मिलिंद शिंदे दिग्दर्शकाच्या भूमिकेत!!

By admin | Updated: May 5, 2017 05:07 IST

अभिनेते मिलिंद शिंदे आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ते दिग्दर्शित करीत असलेल्या चित्रपटाचे शीर्षक

अभिनेते मिलिंद शिंदे आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ते दिग्दर्शित करीत असलेल्या चित्रपटाचे शीर्षक अद्याप गुलदस्त्यात असून या चित्रपटाची ग्रामीण पार्श्वभूमी असणार आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित ते एका स्पोर्ट्स फिल्मचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद किरण बेरड यांनी लिहिले आहेत. सध्या या चित्रपटाचे शूटिंग शिर्डी येथे सुरू आहे. मिलिंद शिंदे यांनी दिग्दर्शन करण्याची ही पहिली वेळ नाहीये. त्यांनी या पूर्वी ‘नाच तुझंच लगीन हाय’ आणि ‘भिडू’ या दोन चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मात्र, नाच तुझंच लगीन हाय हा चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत अडकल्याने अद्याप तो प्रेक्षकांच्या भेटीस येऊ शकला नाही. सेन्सॉरसोबतची त्यांची लढाई सध्या सुरू आहे. तर भिडू हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे कळतेय. आता या दोन चित्रपटानंतर ते नव्या चित्रपटाकडे वळले आहेत. मराठी चित्रपट रसिकांसाठी थोडा वेगळा विषय या चित्रपटातून मांडला जाणार आहे. शिवछत्रपती पुरस्कारात डावललेला एक खेळाडू काही कारणाने आपल्या गावी परत जातो. गावातल्या चोरी करणाऱ्या तीन मुलांना खेळाकडे आकर्षित करून तो त्यांना राष्ट्रीय स्तरापर्यंत कसा नेतो, याची अनोखी गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने मराठीत बऱ्याच काळाने स्पोर्ट्स फिल्मची निर्मिती होत आहे. खेळावर आधारित एक कथानक हाताळताना वेगळा आनंद होत आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच वेगळा अनुभव देईल, असे दिग्दर्शक मिलिंद शिंदे सांगतात. या चित्रपटात अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, उदय टिकेकर, अभिजित चव्हाण, नयन जाधव, प्रकाश धोत्रे अशी स्टारकास्ट आहेत.