विषयाचा बोझडपणा घालवून त्यातील गंमत आणि गोडवा दिग्दर्शक विवेक वाघ यांनी उत्तमरीत्या रेखला आहे. ‘नवलाखा आटर््स मीडिया अॅण्ड एंटरटेंमेण्ट’चे नीलेश नवलखा आणि ‘होली बेसिल प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड’चे विवेक कजारिया यांची दर्जेदार निर्मिती असलेल्या सिनेमांच्या यादीत सिद्धान्त या सिनेमाचे नाव दाखल होणार आहे. या दोघांसोबत यंदा ‘व्हर्च्यू एंटरटेंमेण्ट’चे अमित अहिरराव यांनीदेखील निर्मितीचे उत्तम गणित संभाळत एका दर्जेदार सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा आजोबा अप्पा ठोसर (विक्रम गोखले) आणि त्यांचा नातू वक्रतुंड ठोसर (अर्चित देवधर) यांच्या आयुष्याभोवती फिरतो. त्यांच्यामधल्या नात्याचा एक अतूट धागा हा गणिताचा सिद्धान्त आहे. हा सिनेमा जसजसा खुलत जातो तसे नात्याचे पदर उलगडत जातात. पण या सगळ्याला गुंफणारा प्रेमाचा, विश्वासाचा, नात्याचा धागा आहे. अभिनेता गणेश यादव, सारंग साठ्ये, किशोर कदम, प्रवीण तरडे, अभिनेत्री स्वाती चिटणीस, माधवी सोमण, नेहा महाजन यांच्या अभिनयाने सिनेमाची उंची नक्कीच वाढली आहे. लेखक शेखर ढवळीकर यांची पटकथा, संवाद, कवी सौमित्र - संगीतकार शैलेंद्र बर्वे यांच्या गाण्याची भट्टी मस्त जमली आहे.