Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिभावान गायक, नट व संगीतदिग्दर्शक मास्तर कृष्णराव स्मृतिदिन

By admin | Updated: October 20, 2016 09:06 IST

एक प्रतिभावान गायक, नट व संगीतदिग्दर्शक कृष्णराव गणेशपंत फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव यांचा आज (२० ऑक्टोबर) स्मृतिदिन.

- प्रफल्ल गायकवाड
मुंबई, दि. २० -  एक प्रतिभावान गायक, नट व संगीतदिग्दर्शक कृष्णराव गणेशपंत फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव यांचा आज (२० ऑक्टोबर) स्मृतिदिन.
'मास्तर कृष्णराव' या नावाने महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय असलेल्या कृष्णरावांचा जन्म २० जानेवारी १८९८ साली श्री क्षेत्र आळंदी येथे  झाला.  त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी नाट्यकला प्रवर्तक मंडळी मध्ये प्रवेश केला व हरिभाऊ आपट्यांच्या संत सखूबाई (१९११) या नाटकात विठ्ठलाची भूमिका केली. तेथे त्यांना सवाई गंधर्वांचा गायकीचा लाभ झाला. १९११ पासून त्यांना गायनाचार्य भास्करबुवा बखल्यांचे पट्टशिष्यत्व लाभले. भास्करबुवांप्रमाणेच त्यांच्याही गायनात ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर या घराण्यांचा संगम दिसून येतो. हमखास मैफल जिंकणारे कल्पक व अष्टपैलू गायक म्हणून मास्तरांची ख्याती असून त्यांच्या एकूण ३,००० हून अधिक मैफली संबंध भारतात ठिकठिकाणी झाल्या. त्यांची पहिली स्वतंत्र मैफल वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी जलंदरच्या संगीत महोत्सावात झाली. ख्याल, ठुमरी, नाट्यगीत, भजन इ. गानप्रकार ते सारख्याच रंगतीने पेश करीत. ते ‘गंधर्व नाटक मंडळी’ मध्ये साधारणपणे १९२५ ते १९३३ या काळात होते. तेथे गायकनट व संगीतदिग्दर्शक या नात्यांनी त्यांनी बहुमोल कामगिरी बजावली. शारदा, सौभद्र, एकच प्याला, विद्याहरण, स्वयंवर, द्रौपदी, आशा-निराशा इ. नाटकांतील त्यांच्या पदांच्या चाली यांचा उदाहरणादाखल निर्देश करता येईल. ‘नाट्यनिकेतन’च्या रांगणेकरांच्या कुलवधू या नाटकाला त्यांनी दिलेले संगीत फार गाजले. ‘गंधर्व नाटक मंडळी’ सोडल्यानंतर ते १९३३ मध्ये व्ही. शांताराम यांच्या प्रभात फिल्म कंपनीत संगीतदिग्दर्शक म्हणून रूजू झाले. तेथील वास्तव्यात त्यांनी धर्मात्मा, अमरज्योती, वहाँ, गोपालकृष्ण, माणूस, शेजारी इ. मराठी-हिंदी चित्रपटांना सुमधुर संगीत दिले. पुढे १९४२ मध्ये व्ही. शांताराम यांच्या ‘राजकमल’ चित्रपटसंस्थेतर्फे निघालेल्या भक्तीचा मळा या चित्रपटात संगीतदिग्दर्शनाबरोबरच त्यांनी सावता माळ्याची प्रमुख भूमिकाही केली. तसेच आचार्य अत्र्यांचा वसंतसेना, विश्राम बेडेकरांचा लाखाराणी व नंतरच्या काळातील कीचकवध, विठू माझा लेकुरवाळा या चित्रपटांनाही त्यांनी सुश्राव्य संगीत दिले. वंदे मातरम्ला त्यांनी दिलेली चालही अत्यंत लोकप्रिय ठरली. यांखेरीज त्यांनी संगीतावर ग्रंथ निर्मितीही केली. त्यांपैकी रागसंग्रहचे एकूण सात भाग असून, त्यांत शास्त्रोक्त संगीतातील काही उत्तम चिजा त्यांनी स्वरलिपीसह समाविष्ट केल्या आहेत (१९४३–५७) आकाशवाणीच्या सल्लागार समितीचे सदस्य व आकाशवाणीवरील प्रमुख संगीतरचनाकार या नात्यांनीही त्यांनी भरीव कार्य केले. ‘भारत गायन समाज’, पुणे या संस्थेचे ते अध्यक्ष होते. १९५३ मध्ये चीनला गेलेल्या भारताच्या सांस्कृतीक मंडळाचे ते सदस्य होते. त्यांना शंकराचार्याकडून ‘संगीत कलानिधी’, ही पदवी; पद्मभूषण (१९७१). अखिल भारतीय संगीत नाटक अकादमीतर्फे ‘रत्न सदस्यत्व’ (फेलोशिप, १९७२); ‘बालगंधर्व’ व ‘विष्णुदास भावे’ ही सुवर्णपदके असे अनेक मानसन्मान लाभले. सुगम संगीतात खास स्वतःची शैली निर्माण करणारे सर्जनशील गायक व संगीतकार म्हणून त्यांची कामगिरी मोठी आहे. बोला अमृत बोला हा त्यांच्या आठवणींचा संग्रह (१९८५). २० ऑक्टोबर १९७४ साली पुणे येथे त्यांचे निधन झाले.
 
सौजन्य : मराठी विश्वकोश