Join us

अनिरुद्धच्या पायाखालची जमीन सरकणार? अरुंधती सगळ्यांसमोर करणार आशुतोषच्या मैत्रीचा स्वीकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 17:00 IST

Aai kuthe kay karte: भर मांडवातून अनिरुद्ध, आशुतोषला बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. मात्र, यावेळी अरुंधती आशुतोषच्या बाजूने उभी राहणार असून त्याच्या मैत्रीचा स्वीकार करणार आहे.

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत सध्या देशमुखांकडे लग्नाची गडबड सुरु आहे. अनघा आणि अभि यांचा लग्नसोहळा थाटात पार पडत आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. परंतु, याच आनंदाच्या सोहळ्यामध्ये अनिरुद्धमुळे मीठाचा खडा पडणार आहे. भर मांडवातून अनिरुद्ध, आशुतोषला बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. मात्र, यावेळी अरुंधती आशुतोषच्या बाजूने उभी राहणार असून त्याच्या मैत्रीचा स्वीकार करणार आहे.

स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये अनिरुद्ध, आशुतोषला सगळ्यांसमोर अपमानित करत आहे. इतकंच नाही तर त्याला या लग्नातून निघून जाण्यासही सांगतो. मात्र, अरुंधती आशुतोषची बाजू घेते आणि त्याला लग्न संपेपर्यंत थांबायचा आग्रह करते.

"चालता हो आशुतोष तू या घरातला नाहीयेस", असं म्हणत अनिरुद्ध त्याला निघून जायला सांगतो. पण, "थांबा. तुमच्यामुळे मी खंबीरपणे जगायला शिकले. तुम्ही या घरातले नसलात तरी माझे बिझनेस पार्टनर आहात आणि त्याहून तुम्ही माझे चांगले मित्र आहात", असं अरुंधती म्हणते.

दरम्यान, पहिल्यांदाच आशुतोषची बाजू घेऊन अरुंधतीने त्याच्या मैत्रीचा स्वीकार केला आहे. परंतु, तिच्या या वागण्यामुळे अनिरुद्धवर कोणता परिणाम होणार, ऐन लग्नात तो कोणता नवा वाद निर्माण करणार असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. मात्र, त्याची उत्तरं प्रेक्षकांना येत्या भागातच मिळतील.  

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटिव्ही कलाकारटेलिव्हिजन