राज चिंचणकर ल्ल मुंबईएकाच दिवशी दोनहून अधिक मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या प्रकाराला गेले काही दिवस आळा बसला होता; मात्र जवळजवळ त्याचे उट्टे काढण्याचे काम मे महिन्याच्या उत्तरार्धात होणार आहे. या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात तब्बल ९ मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. विशेष म्हणजे वर्षभरात इतर कोणताही शुक्रवार उपलब्धच नसावा, अशा थाटात मेच्या शेवटच्या शुक्रवारी तब्बल ६ मराठी चित्रपटांचा पडद्यावर सडा पडणार आहे.मे महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी म्हणजे १ तारखेला ‘टाइमपास २’ या चित्रपटाने रुपेरी पडद्यावर धडाक्यात एन्ट्री केली आणि त्याचा प्रभाव या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दिसून आला. परिणामी, ८ तारखेच्या शुक्रवारी एकही मराठी चित्रपट प्रदर्शित झाला नाही. पण १५ तारखेला ‘ऋण’, ‘युद्ध’ आणि ‘सासूचं स्वयंवर’ असे तीन चित्रपट पडद्यावर आले आणि येत्या २२ तारखेला ‘अगं बाई अरेच्चा २’ व ‘पाशबंध’ हे चित्रपट पडद्यावर येत आहेत. याच दिवशी वास्तविक ‘डब्बा ऐसपैस’ हा चित्रपटही प्रदर्शित होण्याची घोषणा झाली असली, तरी या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याची सध्या चर्चा आहे.पण या सगळ्यावर कडी करणार आहे तो मे महिन्याचा शेवटचा शुक्रवार! कारण २९ तारखेला तब्बल ६ मराठी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचा चित्रपटसृष्टीत बोलबाला आहे. ‘सिद्धांत’, ‘पेइंग घोस्ट’, ‘धुरंधर भाटवडेकर’, ‘प्राइम टाइम’, ‘अतिथी पार्ट १’ असे पाच चित्रपट तर या दिवशी प्रदर्शित होत आहेतच; परंतु त्यांच्यासोबत ‘चंद्री’ हा चित्रपटही या दिवशी पडद्यावर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात अजून एखाद्या चित्रपटाची भर पडण्याची अटकळही सध्या बांधली जात आहे. परिणामी या दिवशी चित्रपटगृहांवर मोठी भाऊगर्दी होणार असून, मराठी चित्रपटांचा आपापसात रंगणारा सामना या दिवशी पाहावा लागणार आहे.अर्थातच या सगळ्याचा परिणाम चित्रपट निर्मात्यांना भोगावा लागणार असला, तरी प्रत्येक जण आपलेच घोडे पुढे दामटण्यात मश्गूल असल्याचे सध्या तरी चित्र आहे. येत्या काही दिवसांत या निर्मात्यांनी एकत्र येऊन या संभाव्य पेचावर तोडगा काढण्यास प्राधान्य दिले नाही; तर तिकीटबारीवर या चित्रपटांचा थोड्याबहुत फरकाने कपाळमोक्ष होण्याचीच शक्यता अधिक आहे. या सगळ्या चित्रपटांना चित्रपटगृहे तरी कशी उपलब्ध होणार, हाही एक मुद्दा असून या गडबडीत प्रेक्षकांची स्थिती तर ‘ना घर का, ना घाट का’ अशीच होणार आहे.