राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड (Vikram Gaikwad) यांचे वयाच्या ६१ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. पवईतील हिरानंदानी रुग्णालयात ते दाखल होते. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान अभिनेता सुबोध भावे(Subodh Bhave)ने सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सुबोध भावेने विक्रम गायकवाड यांचा फोटो शेअर करत लिहिले की, ''विक्रम दादा तुला भावपूर्ण श्रद्धांजली. तुझ्यासारखा कलावंत या मातीत घडला हे आमचं भाग्य. कितीतरी कलाकारांच्या आयुष्यात तू आशिर्वाद म्हणुन आलास आणि त्यांना त्यांच्या भूमिकेला भिडण्याचे धैर्य दिलेस. लेखकांनी आणि दिग्दर्शकांनी कल्पनेत पाहिलेल्या व्यक्तिरेखांना तू तुझे खरे "रंग" दिलेस. माझ्या आयुष्यात बालगंधर्व, लोकमान्य, कट्यार काळजात घुसली, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर आणि तुला पाहते रे या सर्व कलाकृतींमध्ये तुझे योगदान अभूतपूर्व आहे. तुझ्याशिवाय या भूमिकांचा विचार ही मी करू शकत नाही. तुझ्या सारखा कलावंत आमच्या आयुष्यात आला आणि आम्हाला समृद्ध करून गेला. माझ्या साठी तू कायमच जिवंत आहेस. खूप मनापासून प्रेम आणि तुला वंदन विक्रम दादा. ओम शांती. ''
विक्रम गायकवाड यांना कोरोनामध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासून ते आजारी होते. मात्र गेल्या ८ दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे त्यांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल केले होते. पण आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योत्स्ना आणि मुलगी तन्वी आहे. विक्रम गायकवाड यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरील सरदार या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केले होते. त्यांनी मेकिंग ऑफ महात्मा, बालगंधर्व, संजू, ८३ या चित्रपटात आपल्या मेकअप कौशल्याने अनेक पात्र जिवंत केले होते. त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.