Join us
Daily Top 2Weekly Top 5

गायन, अभिनय करत असताना आर्याने ‘या’ गोष्टीकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही, काय आहे ती गोष्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 10:06 IST

आर्याचा हा पहिलाच मराठी चित्रपट हिटच्या यादीत सामील झाला आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेसोबत आर्याची रुपेरी पडद्यावर जोडी जमली आणि प्रेक्षकांनी त्यांना पसंतीची पावती दिली.

गायनाबरोबरच अभिनयातही स्वतःचं नाव कमावणारी मराठमोळी मुलगी म्हणजे आर्या आंबेकर. आर्याने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपट आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. विशेष म्हणजे माणिक वर्मा शिष्यवृत्तीही तिनं मिळवली आहे. विविध मालिकांसाठीही तिने गाणी गायली आहेत. गायनासह तिने ती सध्या काय करते या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. आर्याचा हा पहिलाच मराठी चित्रपट हिटच्या यादीत सामील झाला आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेसोबत आर्याची रुपेरी पडद्यावर जोडी जमली आणि प्रेक्षकांनी त्यांना पसंतीची पावती दिली. लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे आर्या लक्ष वेधून घेते. 

आर्या सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव्ह असते. गायन आणि अभिनयात करियर करत असताना तिने आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. नुकताच तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. आर्याने आपला प्रबंध म्हणजेच थिसीस तयार केला असून तो जमा करण्यासाठी सज्ज असल्याचे ती या फोटोत पाहायला मिळते आहे. थिसीस तयार झाल्याचा आनंद आणि समाधान तिच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.

 

या फोटोसह तिने कॅप्शनही दिले आहे. “माझ्या कॉलेजमुळे मी सर्व काही करु शकले,ज्याची मला कल्पनाही नव्हती” असं तिने म्हटलं आहे. लेखन ही त्याचपैकी एक गोष्ट असून त्यामुळे थिसीस तयार झाल्याचा आनंद आणि समाधान जास्त असल्याचं तिने आवर्जून नमूद केले आहे. काही गोष्टी जाणीवपूर्वक लपवल्याचेही तिने कॅप्शनमध्ये सांगितलंय. शैक्षणिक जीवनातील हा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केल्याबद्दल आर्याचे अभिनंदन आणि शुभेच्छा.