Join us

अभिनय की व्हॉइस ओव्हर कशावर तुझं जास्त प्रेम आहे?, मेघना एरंडे म्हणाली - "ना धड इकडे अन्..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 17:52 IST

मेघना एरंडे (Meghana Erande) अभिनेत्री आणि व्हॉईस आर्टिस्ट आहे. ती हिंदी आणि मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. मेघना एरंडे यांना व्हॉईस आर्टिस्ट म्हणून विशेष ओळख मिळाली आहे.

मेघना एरंडे (Meghana Erande) अभिनेत्री आणि व्हॉईस आर्टिस्ट आहे. ती हिंदी आणि मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. मेघना एरंडे यांना व्हॉईस आर्टिस्ट म्हणून विशेष ओळख मिळाली आहे. तिने अनेक लोकप्रिय कार्टून आणि ऍनिमेटेड पात्रांना आवाज दिला आहे, ज्यात निन्जा हत्तोरी, नॉडी, पोकेमॉन अशा बऱ्याच पात्रांचा समावेश आहे. याशिवाय तिने अनेक हॉलिवूडपटांना आवाज दिलाय आणि बाहुबलीमध्ये शिवगामी या पात्राला व्हॉइस दिला आहे. याशिवाय मेघनाने मराठी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. नुकतेच एका मुलाखतीत तिला अभिनय की व्हॉइस ओव्हर, कशावर प्रेम जास्त आहे, असं विचारलं होतं. त्यावेळी तिने व्हॉइसओव्हर असं उत्तर दिलं.

मेघना एरंडे हिने नुकतेच आरपार ऑनलाइनला मुलाखत दिली. त्यावेळी अभिनय की व्हॉइस ओव्हर कशावर तुझं जास्त प्रेम आहे, असं विचारल्यावर मेघना म्हणाली की,'' जेव्हा तुम्ही अभिनय करता ना तुम्हाला एक वेगळं ग्लॅमर येतं. जसं तू म्हणालीस मेकअप आहे, कॉश्च्युम आहेत, लाइटिंग आहे. तुझा कॅमेरावर्क आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. इथे तुझ्याकडे काही नाहीये. फक्त तुझा गळा आणि तुझा माइक आहे आणि तुझे कान फक्त एवढंच. तर मी तर म्हणेन हे जास्त कठीण आणि अजून जोखमीचं काम आहे. जे इथे करायला मिळतंय. ''

''मग पुन्हा अभिनयाकडे वळेन...''

ती पुढे म्हणाली, ''बरं एक आतली गोष्ट सांगू तुला आता की जे शूटिंगवाले असतात ना त्यांना वाटतं की अरे ही तर डबिंग डबिंग करतेय. मग हिला पुन्हा काहीतरी चांगला प्रोजेक्ट मिळाला तर ती बिझी होईल. नको राहू दे जे डबिंगवाले असतात अरे ये तो अॅक्टर है इसको तो मतलब टीव्ही पे मिल गया. तो फिर उसका इव्हेंट रहता है. उसको अँकरिंग करना है...तो वो डेट्स मॅच नहीं होंगे फिर तर तुम्हाला ना धड इकडे ही नाही आणि धड तिकडे ही नाही असं थोडसं मध्यंतर होऊ शकत होतं. म्हणून मग मी म्हटलं की ठीके. आपण आत्ता जर फक्त डबिंग केलं तर आपल्या मुलीकडे लक्ष देता येईल. आता ती १३ वर्षांची आहे. तिची दहावी झाली ना की मग पुन्हा अभिनयाकडे वळेन. पण जर तू माझं पहिलं प्रेम विचारलंस तर व्हॉइसओव्हर आहे.''