Join us
Daily Top 2Weekly Top 5

"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:05 IST

Vaibhav Mangale: उर्वरीत महाराष्ट्राचं मला माहीत नाही . पण मुंबईत मराठी माणसाच्या मराठीची वाट लागलेली आहे. कामाच्या ठिकाणी सतत हिंदी किंवा इंग्रजी बोलावं लागतं, हा एक भाग. दुसरं म्हणजे त्यांना आपापसातसुद्धा मराठी बोलायची लाज वाटते. आपली मुलं चांगलं मराठी बोलायचं विसरून गेली आहेत. त्यात आता राष्ट्रभाषेची सक्ती केली तर संपलंच सगळं.

नवीन शिक्षण धोरणातील त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषेला राज्यात पहिलीपासून शिकवण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला सध्या तीव्र विरोध होत आहे. पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्यात आल्याने मुलांवर अतिरिक्त ताण पडेल, तसेच मराठी भाषेची गळचेपी होईल, असा आरोप हिंदी भाषा अनिवार्य करण्यास विरोध करणाऱ्या मराठी भाषाप्रेमींकडून केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील वैचारिक विश्वामध्ये हिंदी भाषेच्या सक्तीवरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अभिनेते वैभव मांगले यांनीही मराठी भाषेच्या सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त सोशल मीडियावर खरमरीत पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये वैभव मांगले म्हणतात की, उर्वरीत महाराष्ट्राचं मला माहीत नाही . पण मुंबईत मराठी माणसाच्या मराठीची वाट लागलेली आहे. कामाच्या ठिकाणी सतत हिंदी किंवा इंग्रजी बोलावं लागतं, हा एक भाग. दुसरं म्हणजे त्यांना आपापसातसुद्धा मराठी बोलायची लाज वाटते. आपली मुलं चांगलं मराठी बोलायचं विसरून गेली आहेत. त्यात आता राष्ट्रभाषेची सक्ती केली तर संपलंच सगळं.  मातृभाषेची ( मुळात आई मराठी बोलत असले तर ) भिकारणीची अवस्था होईल.

वैभव मांगले पुढे लिहितात की, आता तर खेडोपाडी इंग्रजी शाळा झाल्या आहेत. मुंबई, पुणे येथे अनेक शाळांमध्ये मराठी शिकवलं जात नाही. मुलांशी घरात इंग्रजी बोला असं सांगितलं जातं. घरात आई-बाबाला धड इंग्रजी येत नाही. शाळेत शिक्षकांचं जे ऐकतील ते मुलं शिकतात ( शिक्षक तरी किती चांगलं बोलतील ). त्यामुळे धड इंग्रजी नाही, धड मराठी नाही, अशी अवस्था झालेली आहे. त्यात बोलीभाषा वेगवेगळ्या, मग पुन्हा शाळेत प्रमाण भाषा शिका. त्याचा वेगळा ताप. घरात आई खिमट म्हणते आणि शाळेत मऊभात म्हणा असं सांगतात. मी उबारलायस म्हणतो, शाळेत उभा राहिला आहेस म्हणतात. “माझ्या वांगडा चल “म्हणतो तर शाळेत ‘’माझ्या बरोबर चल’’, म्हणा असं सांगतात. ही त्या बालमनाला संकटं वाटतात. तर अजून राष्ट्रभाषा जोडीला आणून बसवली तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा.

एकूणच आपण आपल्या भाषेची कमालीची भीषण अवस्था केली आहे. तिच्याबद्दल कमालीचा अनादर आहे. आम्हाला तर सिरियल ला स्क्रिप्ट सुद्धा मराठीत देत नाहीत ( अनेक ठिकाणी ). तर इतर ठिकाणी जिथे हिंदी भाषिक इंग्रजाळलेले लोक आपली काय पत्रास ठेवतात ते आपण पाहतो आहोत .हिंदी पहिलीपासून येईल न येईल हा माझ्यासाठी नंतरचा मुद्दा आहे. ती येणारही नाही कदाचित. पण म्हणून आपलं मराठी भाषेबद्दलच प्रेम वाढणार आहे का?? आपण आपल्या मुलांचं मराठी चांगलं होण्यासाठी अधिक सजग होणार आहोत का?. मुळात आपण मराठीत बोलणार आहोत का???? असे प्रश्न वैभव मांगले यांनी उपस्थित केले आहेत. 

टॅग्स :वैभव मांगलेमराठीहिंदीमहाराष्ट्र