दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या आणि सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवलं आहे. कोकणातील गूढ कथेवर आधारित असलेला हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून, या चित्रपटाने तिकीटबारीवर दमदार कमाई केली आहे. जाणून घ्या 'दशावतार'ची १४ दिवसांची कमाई किती झाली?
'दशावतार'ची कमाई किती?
'दशावतार' हा चित्रपट प्रदर्शित होऊन काही आठवडे उलटले असले तरी त्याची बॉक्स ऑफिसवरील यशस्वी घोडदौड सुरूच आहे. Sacnilk च्या माहितीनुसार, या चित्रपटाचे एकूण कलेक्शन १७.५० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. दुसऱ्या आठवड्यातही माऊथ पब्लिसिटिच्या जोरावर चित्रपटाने चांगली कमाई केली. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ९.२ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या वीकेंडला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे कमाईत मोठी वाढ झाली.
मराठीतील या वर्षातला मोठा हिट चित्रपट
'दशावतार'ने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत अनेक जुने रेकॉर्ड मोडले आहेत. हा चित्रपट २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. कोकणची संस्कृती, चित्तथरारक कथा आणि दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर आणि सिद्धार्थ मेनन यांच्यासह इतर कलाकारांच्या सशक्त अभिनयामुळे हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याचा अनुभव प्रेक्षकांना आवडला आहे. निर्मात्यांनी वेळोवेळी तिकीट दरांमध्ये सवलत देऊन प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, ज्याचा फायदाही चित्रपटाला झाला.