नुकतेच सगळीकडे गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहरे(Prarthana Behere)च्या घरीदेखील बाप्पा विराजमान झाले आहेत. नुकतेच तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओत तिची लेकरं बाप्पाचं स्वागत करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
प्रार्थना बेहरेने नुकतेच इंस्टाग्रामला एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती कोणाच्या तरी येण्याची वाट पाहत आहे. त्यानंतर एकानंतर तिने पाळलेले कुत्रे येताना दिसत आहेत आणि ते प्रार्थनाचे लाड करताना दिसत आहेत. त्यानंतर अभिनेत्री त्यांना बाप्पाजवळ घेऊन जाताना दिसली. या व्हिडीओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ''माझा बाप्पा घरी आला, आणि माझी लेकरं — माझी पिल्लं. आनंदाने त्यांच्या शेपटी हालवत आपल्या बाप्पाचं स्वागत करतायत! ‘गणपती बाप्पा मोरया!’ '' प्रार्थनाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांसोबत सेलिब्रेटींनीही लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
प्रार्थना बेहरेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'चिकी चिकी बुबूम बुम' या सिनेमात झळकली होती. तिच्यासोबत या सिनेमात प्राजक्ता माळी, स्वप्नील जोशी, वनिता खरात हे कलाकार होते. त्यानंतर आता ती तिचा नवरा अभिषेक जावकरने दिग्दर्शित केलेल्या सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला. अद्याप या चित्रपटाचे शीर्षक ठरलेले नाही.