ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (usha nadkarni) या मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. उषा यांना आपण विविध हिंदी मालिका, टेलिव्हिजनमध्ये अभिनय करताना पाहिलंय. 'पवित्र रिश्ता' मालिकेत उषा नाडकर्णींनी सुशांत सिंग राजपूतच्या आईची भूमिका साकारली होती. याशिवाय 'रुस्तम' सिनेमात त्यांनी अक्षय कुमारसोबत काम केलं. उषा नाडकर्णींनी 'पुरुष' नाटकात काम केलं होतं. या नाटकाच्या दौऱ्यादरम्यान आलेला भयानक अनुभव उषा यांनी शेअर केला.
झावळीतून मुलांनी कपडे बदलताना पाहिलं अन्...
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत उषा नाडकर्णींनी पुरुष नाटकादरम्यान आलेला भयानक अनुभव शेअर केला. उषा म्हणाल्या, "पूर्वी गोवा, कोकण वगैरे दौरे करताना तिथे झावळ्यांची थिएटर्स असायची. आम्ही कपडे बदलायला जायचो तिथे पण झावळ्याच असायच्या. तेव्हा झावळ्यांमध्ये बोटं घालून पोरं बघायची. आम्हाला माहिती नव्हतं की पोरं असं करत आहेत. पण जेव्हा लक्षात आलं तेव्हा खूप किंचाळलो! म्हणजे अनपेक्षित दिसल्यावर किंचाळतोच ना माणूस. त्यामुळे आम्ही किंचाळायचो."
गावात होणाऱ्या नाटकांच्या दौऱ्याचा अनुभव सांगताना उषा म्हणाल्या, "त्यावेळी थिएटर्स आणि त्याला रुम्स असं काही नव्हतं. ते काही वेगळंच होतं. आता ते नाहीय. तशी आता गावात थिएटर्स वगैरे झाली आहेत त्यामुळे ती आधीची मजा नाहीय. पण त्याकाळी मजेबरोबर सजा पण होती. लोक खूप त्रास द्यायचे. थिएटर नाही, त्याला रुम नाही म्हणून भीतीही वाटायची. साखर कारखान्यात आमचे शो व्हायचे. त्यावेळेला आम्ही तसे शो खूप केले पण आता साखर कारखान्यात तसे शो होत नाहीत. पूर्वी गणपतीच्या वेळेला किती शो व्हायचे. आताच्या पोरांना माहितीच नाही साखर कारखाना म्हणजे काय असतं ते!"