अभिनय आणि सौंदर्याने ७०-८०चं दशक गाजवणाऱ्या दोन मराठी अभिनेत्री म्हणजे रंजना देशमुख आणि उषा चव्हाण. एक उत्तम नटी असण्यासोबतच त्या दोघीही उत्कृष्ट डान्सरही होत्या. रंजना देशमुख आणि उषा चव्हाण यांनी एकत्र अनेक सिनेमांमध्ये कामंही केलं होतं. तेव्हा त्यांच्यात चांगली मैत्री आणि त्याबरोबरच स्पर्धाही होती. दुर्देवाने रंजना देशमुख यांनी अकाली एक्झिट घेतली. आता इतक्या वर्षांनी ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण त्यांची लाडकी मैत्रीण आणि अभिनेत्री रंजना देशमुख यांच्याबाबत भरभरुन बोलल्या आहे.
उषा चव्हाण यांनी त्यांच्या युट्यूबवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या म्हणतात, "अनेकांनी मला विचारलं होतं की रंजना देशमुख आणि तुमचं काय नातं आहे? तुम्हीदेखील देशमुख आहात. मी म्हणायचे आमच्यात मैत्रीचं नातं होतं. त्यावेळी असं वाटत होतं आम्ही दोघी बोलतच नाही. पण असं नव्हतं. 'सुळावरची पोळी' हा सिनेमा आम्ही केलेला आणि त्यामध्ये आम्ही दोघीही होतो. तिचं काम रवींद्र महाजनी यांच्यासोबत होतं आणि माझी जोडी अशोक सराफ यांच्यासोबत होती. तेव्हा अनेक लोक म्हणायचे की तुमच्यासारखाच रंजना देशमुख यांचा फेस दिसतोय...तुम्ही बहिणी आहात का? मी सांगायचे आम्ही जवळच्या मैत्रिणी आहोत".
"त्या काळी आमच्यात थोडी स्पर्धा होती. मला जे सिनेमे मिळायाचे, त्यातले तिलाही वाटायचं की तिला हा सिनेमा मिळावा. पण रान पाखरं सिनेमाच्या वेळी असं झालं नाही. तिला त्या सिनेमात भूमिका करायची खूप इच्छा होती. पण निर्मात्यांना मी डान्स खूप छान करते आणि तो त्याच अंगाचा चित्रपट आहे असं म्हणणं होतं. मी त्यांना रंजनाचं नाव सुचवलं होतं. तीही उत्कृष्ट डान्स करते, अभिनय तर उत्तम आहेच असं त्यांना म्हटलं. हा चित्रपट करण्यासाठी रंजना पैसेही घेणार नव्हती. पण, निर्मात्यांना तो चित्रपट मलाच द्यायचा होता. त्यामुळे रंजना नाराज झाली होती. त्यानंतर 'अरे संसार' चित्रपट देखील माझ्याकडेच आला. पण, मी रंजनाच्या नावावर ठाम होते. तिने तो चित्रपट केला, तिला बक्षीस मिळालं. कलाकार म्हणून त्या खूप चांगल्या होत्या. आमची मैत्री खूप चांगली होती", असंही त्या म्हणाल्या.
पुढे त्यांनी सांगितलं की "तिला पुण्यातील मक्याचा चिवडा खूप आवडायचा. त्यानंतर रंजनाचा अपघात झाला तेव्हा मी तिला भेटायला मुंबईत गेले होते. तिच्या आई वत्सला देशमुख माझ्यावर खूप प्रेम करायच्या. मी भेटायला गेल्यावर तिने पहिलं विचारलं की चिवडा आणलास का सांग? तो तिच्यासाठी मी घेऊन गेले होते. तिला खूप आनंद झाला होता. एवढी खुश राहणारी अभिनेत्री आज असायला हवी होती. वाईट वाटतं... प्रेक्षकांनी विचारलं की तुमच्या दोघींचं पटत नव्हतं का? तर असं काहीच नाही. माझं सगळ्यांशी पटायचं. अगदी गणपत पाटील ते लक्ष्मीकांत बेर्डे पर्यंत सगळ्यांसोबत मी काम केलं. चाहत्यांनो कृपा करून गैरसमज करून घेऊ नका".
Web Summary : Usha Chavan recalls her friendship and healthy competition with Ranjana Deshmukh. Despite rivalry for roles, they shared a close bond, especially after Ranjana's accident. Usha fondly remembers bringing Ranjana her favorite snack.
Web Summary : उषा चव्हाण ने रंजना देशमुख के साथ अपनी दोस्ती और स्वस्थ प्रतिस्पर्धा को याद किया। भूमिकाओं के लिए प्रतिद्वंद्विता के बावजूद, उन्होंने एक करीबी बंधन साझा किया, खासकर रंजना की दुर्घटना के बाद। उषा ने रंजना के लिए उसका पसंदीदा नाश्ता लाने की बात याद की।