Join us

"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 13:50 IST

Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापटची नुकतीच 'अंधेरा' ही हॉरर सीरिज भेटीला आली आहे. या सीरिजच्या निमित्ताने अभिनेत्रीने बऱ्याच ठिकाणी मुलाखती दिल्या. एका मुलाखतीत तिने तिच्या दादरच्या घरात आलेला भयावह अनुभव सांगितला.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री प्रिया बापट(Priya Bapat)ची नुकतीच 'अंधेरा' (Andhera Web Series) ही हॉरर सीरिज भेटीला आली आहे. यात तिने महिला पोलीस अधिकारीची भूमिका साकारली आहे. या सीरिजच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच हॉरर जॉनर आणि पोलिसाची भूमिका साकारते आहे. या सीरिजच्या निमित्ताने अभिनेत्रीने बऱ्याच ठिकाणी मुलाखती दिल्या. एका मुलाखतीत तिने तिच्या दादरच्या घरात आलेला भयावह अनुभव सांगितला.

प्रिया बापटने दिव्या अग्रवालला दिलेल्या मुलाखतीत दादरच्या घरात तिला मध्यरात्री ३-४ वाजता आलेला भयानक अनुभव सांगितला. ती म्हणाली की, मी लहानाची मोठी दादरमध्ये झाले. माझ्या आईवडिलांचं घर दादरमध्ये आहे. एकदा तिथे मला खिडकीतून कोणीतरी आल्याचा भास झाला. ते फक्त पाहत होते. त्यांनी कोणाला काहीच नाही केले. मला घुंगरुचे आवाज ऐकू आले छन छन छन. त्याचवेळी मला त्याच्या पावलांचा आवाज येत होता.

''हे सगळं मध्यरात्री ३-४च्या सुमारास घडलं''

प्रिया पुढे म्हणाली की, ''मी खूप घाबरट आणि फट्टू आहे. घाबरल्यावर मी काही करु शकते. पण त्यावेळी मला अजिबात भीती नाही वाटली. मी शांत होते. भीतीने मी माझे डोळे उघडलेच नाही. पण कोणीतरी खिडकीतून माझ्या घरात शिरल्याचे मला जाणवत होते. छन छन छन असा आवाज करत ते माझ्या आई-वडिलांच्या खोलीच्या दिशेने गेले. तो आवाज माझ्या जवळून गेल्याचं मला जाणवलं. तो तिथे गेला आणि सेटल झाला. थोड्या वेळाने तोच आवाज पुन्हा आला आणि मग सगळं शांत झालं. हे सगळं मध्यरात्री ३-४च्या सुमारास घडलं.''

प्रियाच्या बाबांनाही आला तसाच काहीसा अनुभव

प्रियाने रात्री तिला आलेला अनुभव तिच्या आई वडिलांना सांगितला. त्यांचा तिच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. पण तेव्हा तिचे बाबाही म्हणाले की, त्यांनाही तसंच जाणवलं. त्यांच्या बाजूला कोणीतरी येऊन बसलं आणि नंतर उठून निघून गेल्याचं जाणवलं. वडिलांना आलेला सेम अनुभव सांगितल्यानंतर प्रिया म्हणाली की, "असं म्हणतात की, वास्तुपुरूष असतात. कोकणात हे फार सांगितलं जातं. ते खूप चांगले आत्मे असतात. तुम्ही सुरक्षित आहात ना हे पाहण्यासाठी ते येतात. ज्यांचा अध्यामावर विश्वास आहे किंवा मोठ्या शक्तींवर विश्वास आहे, त्यांना असे अनुभव बऱ्याचदा येतात." 

टॅग्स :प्रिया बापट