सध्या मराठी मनोरंजन विश्वात एका सिनेमाची चांगलीच चर्चा आहे तो सिनेमा म्हणजे 'बंजारा'. अभिनेते शरद पोंक्षे यांचा लेक स्नेह पोंक्षे या सिनेमातून दिग्दर्शनात आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. या सिनेमात भरत जाधव, सुनील बर्वे, शरद पोंक्षे प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमाचं टायटल साँग नुकतंच रिलीज झालं आहे. मैत्री आणि निसर्ग यांचा अनोखा संगम या गाण्यातून पाहायला मिळतोय. जाणून घ्या या गाण्याबद्दल
'बंजारा' सिनेमाचं टायटल साँग रिलीज
‘बंजारा’ या शीर्षकातच एक भटकंतीची, मुक्ततेची आणि अनुभवांची भावना आहे. हे गाणे त्या भावना मनात खोलवर रुजवून जाते. या टायटल साँगमधून प्रेक्षकांना एक भावनिक प्रवास अनुभवता येईल. या गाण्याचे संगीत अवधूत गुप्ते यांचे असून विशाल दादलानी यांच्या आवाजात ते अधिक जिवंत झाले आहे. तर गुरु ठाकूर यांच्या शब्दांनी मैत्रीचे क्षण, संवाद, आणि नात्यांची गडद किनार यांना सुंदरपणे व्यक्त केले आहे.
गाण्याबद्दल स्नेह पोंक्षे म्हणतो, “‘बंजारा’मधून तीन मित्रांच्या माध्यमातून आम्ही मैत्रीचे एक वेगळे रूप उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. जिथे मैत्री म्हणजे फक्त मजा-मस्ती नाही, तर एकमेकांच्या प्रवासाचे साक्षीदार होणे आहे. गाणं चित्रीत करताना आणि त्यातील प्रत्येक फ्रेम अनुभवताना मला माझ्या स्वतःच्या आयुष्यातील अनेक क्षण डोळ्यांसमोर आले. या गाण्याने प्रेक्षकांना देखील असाच अनुभव येईल याची मला खात्री आहे.”
प्रस्तुतकर्ता शरद पोंक्षे म्हणतात, “ बंजारा’या गाण्यातून आम्ही तीन मित्रांची भटकंती आणि त्यांचा भावनिक प्रवास दाखवला आहे. निसर्गाच्या सानिध्यात घडत असलेला मैत्री, आत्मशोधाचा हा प्रवास या गाण्यातून उलगडणार आहे. प्रत्येकाला त्यांच्या मैत्रीच्या दिवसांची आठवण होईल.”
मोरया प्रॉडक्शन्स प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन स्नेह पोंक्षे यांचे आहे. प्रमुख भूमिकांमध्ये शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज झळकणार असून, निर्मिती रोहिणी विजयसिंह पटवर्धन यांची आहे.तर शरद पोंक्षे प्रस्तुतकर्ता आहेत. येत्या १६ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.