Join us

सुबोध भावेचा नवा बायोपिक! नीम करोली बाबा यांच्या भूमिकेत दिसणार, पहिलं पोस्टर समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 17:53 IST

नीम करोली बाबा यांच्या आयुष्यावर सिनेमा येणार; मराठी अभिनेता सुबोध भावे मुख्य भूमिकेत

'हर हर महादेव', 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर', 'संत तुकाराम', 'लोकमान्य : एक युगपुरुष', 'बालगंधर्व' यांसारख्या बायोपिकमध्ये भूमिका वठवणारा सुबोध भावे आत नीम करोली बाबा यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नीम करोली बाबा यांच्यावर बायोपिक येत आहे. 'श्री बाबा नीब करोरी महाराज' असं सिनेमाचं नाव असून या सिनेमातून त्यांचा जीवनप्रवास उलगडण्यात येणार आहे. या सिनेमात अभिनेता सुबोध भावे नीम करोली बाबा यांची भूमिका साकारणार आहे. हा एक हिंदी सिनेमा असून याचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

'श्री बाबा नीब करोरी महाराज' सिनेमाच्या पोस्टरवर सुबोध भावे नीम करोली बाबा यांच्या लूकमध्ये दिसत आहे. छोटे केस, थोडी दाढी, कपाळावर टीका आणि घोंगडी घेऊन बसलेल्या नीम करोली बाबा यांच्यासारखाच तो हुबेहुब दिसत आहे. आज लखनऊ मध्ये आमच्या आगामी " बाबा नीम करोली" यांच्या आयुष्यावर आधारित हिंदी चित्रपटाच्या पोस्टर च अनावरण संपन्न झाले. बाबांची भूमिका साकारण्याचे भाग्य मला लाभले. लवकरच हा चित्रपट रसिकांसमोर येईल. जय श्रीराम! जय हनुमान!", असं कॅप्शन देत सुबोध भावेने त्याच्या या नव्या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. 

कोण आहेत नीम करोली बाबा? 

नीम करोली बाबा हे या काळातील दैवी पुरुषांपैकी एक मानले जातात. उत्तराखंडमधील कैंची धाममध्ये त्यांचं आश्रम आहे. वयाच्या 17 व्या वर्षी बाबा नीम करोली यांना देवाबद्दल विशेष ज्ञान मिळाले. ते हनुमानजींना आपले गुरू मानत होते. बाबांनी आपल्या आयुष्यात जवळपास 108 हनुमान मंदिर बांधली आहेत. सामान्य माणसासारखे बाबा नीम करोली जगले. अनेक सेलिब्रिटींचे ते श्रद्धास्थान आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा त्यांच्या आश्रमात गेले होते. तर फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनीही आश्रमाला भेट दिली होती. 

टॅग्स :सुबोध भावे सेलिब्रिटीसिनेमा