Join us

"आधी लगीन कोंढाण्याचं मग..." दिग्पाल लांजेकरांच्या 'सुभेदार' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 11:35 IST

'सुभेदार' सिनेमाची उत्सुकता वाढली.

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'सुभेदार' (Subhedar) सिनेमाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अंगावर शहारे आणणऱ्या या ट्रेलरने सिनेमाची उत्सुकता आणखी वाढवली आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकमधील 'सुभेदार' हा पाचवा सिनेमा आहे. 'आधी लगीन कोंढाण्याचं अन् मंग रायबाचं' असं म्हणत सुभेदार तानाजी मालुसरे शिवरायांना आश्वासन देतात. सिनेमात तानाजी मालुसरे यांची शौर्यकथा बघायला मिळणार आहे. 

मृणाल कुलकर्णी यांनी जिजाऊंची भूमिका साकारली आहे. आमच्या लाडक्या कोंढाण्यावरचे मुघलांचे निशाण आमच्या डोळ्यात तिखटाप्रमाणे झोंबत आहेत या जिजाऊंच्या डायलॉगने ट्रेलरची सुरुवात होते. कोंढाणा जिंकणारच असं आश्वासन शिवबा जिजाऊंना देतात आणि ही जबाबदारी सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या खांद्यावर सोपवतात. घरात रायबाच्या लग्नाची लगबग सुरु असतानाच तानाजी मात्र कोंढाणा किल्ला जिंकण्याची शप्पथ घेतात. ५०० मावळे खूप झाले असा विश्वास तानाजी देतात. ट्रेलरमधील अनेक प्रसंग अंगावर शहारे आणणारे आहेत. 

अभिनेता अजय पुरकर तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत आहे तर चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. याशिवाय स्मिता शेवाळे, मृण्मयी देशपांडे, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी यांच्याही भूमिका आहेत. १८ ऑगस्ट रोजी सिनेमा प्रदर्शित होत आहे. 

टॅग्स :मराठी चित्रपटदिग्पाल लांजेकरअजय पुरकरचिन्मय मांडलेकर