Join us  

Nagraj Manjule : -म्हणून साऊथचे सिनेमे चालतात..., नागराज मंजुळे यांनी सांगितली दोन कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 4:27 PM

Nagraj Manjule : ‘सैराट’ या चित्रपटानंतर नागराज अण्णांना अमाप लोकप्रियता मिळाली. याच नागराज अण्णांचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. साऊथचे सिनेमे का चालतात? याची दोन कारणं त्यांनी सांगितली आहेत.

‘सैराट’ चित्रपट आठवला की सर्वप्रथम आठवतात ते आर्ची आणि परश्या. पाठोपाठ आठवतात ते नागराज मंजुळे(Nagraj Manjule). होय, ‘सैराट’ या चित्रपटाच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला सैराट करणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. ‘सैराट’ या चित्रपटानंतर नागराज अण्णांना अमाप लोकप्रियता मिळाली. याच नागराज अण्णांचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. साऊथचे सिनेमे का चालतात? याची दोन कारणं त्यांनी सांगितली आहेत.

‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत नागराज मंजुळे या मुद्यावर बोलले. ते म्हणाले,‘ गेल्या अनेक वर्षांपासून साऊथचे लोक आपले सिनेमे हिंदीत डब करून हिंदी प्रेक्षकांपुढे सादर करत आहेत. यामागे त्यांची अनेक वर्षांची मेहनत आहे आणि म्हणून आता पुष्पा, बाहुबली सारखे अपार यश मिळवत आहेत. याशिवाय माझ्यामते, यशस्वी ठरलेले सगळे साऊथ सिनेमे उत्तम होते. साऊथचे सिनेमे आहेत म्हणून ते चालले नाहीत. चांगले चित्रपट आहेत म्हणून चालले. अन्य कोणत्याही भाषेत केले असते तरी ते चालले असते.

मराठी चित्रपट कधीच डब होत नव्हते. आत्ता कुठे आपण डबिंगचा विचार करू लागलो आहोत. आपल्याला इतक्यात यश मिळेल अशी अपेक्षा नाही. कदाचित काही वर्षानंतर मराठीचे अन्य भाषेत डब केलेले सिनेमेही असेच यशस्वी होतील. आपल्याकडेदेखील नाना पाटेकर, सयाजी शिंदे असे उत्तम कलाकार आहेत. आपण त्यांना हे दाखवून दिले पाहिजे. त्या लोकांनी खूप आधी प्रयत्न केले म्हणून ते आता यशस्वी झाले आहेत,असंही ते म्हणाले.

नागराज मंजुळे यांनी फँड्री,  सैराट, झुंड,  नाळ असे दमदार सिनेमे बनवले. ‘झुंड’ चित्रपटाच्या भरघोस यशानंतर आता त्यांचा ‘घर, बंदूक, बिर्यानी’ चित्रपटाची घोषणा केली आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. यात नागराज मंजुळे यांचा लूक अगदी थक्क करणारा आहे.  

टॅग्स :नागराज मंजुळेमराठी अभिनेताTollywoodसिनेमा