गेल्या काही दिवसांत ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढत आहेत. मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन एकत्र आलेले ठाकरे बंधू मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत युती करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गणेशोत्सवासाठी उद्धव ठाकरेंनी कुटुंबासहित हजेरी लावली होती. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर आता मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने भाष्य केलं आहे.
गणेशोत्सवानिमित्त सोनालीने मुंबई तकला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला ठाकरे बंधूंवर प्रश्न विचारण्यात आला. "ठाकरे बंधू आता एकत्र आले आहेत. ते कायमस्वरुपी एकत्र दिसावेत असं वाटतं का?". या प्रश्नाचं उत्तर देताना सोनाली म्हणाली, "हे खूपच हायपोथेटिकल आहे. त्यामुळे आता काहीच सांगू शकत नाही. जोपर्यंत ठाकरे बंधू औपचारिक घोषणा करत नाहीत तोपर्यंत या अफवा, चर्चा यावर नक्की विश्वास ठेवावा हे प्रश्नार्थी आहे. पण, महाराष्ट्राच्या संस्कृती, राजकीय आणि सामाजिक परिस्थितीसाठी हे चांगलं असेल तर हे नक्कीच व्हावं आणि कायमस्वरुपी व्हावं".
सोनाली कुलकर्णी ही मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळखली जाते. दरवर्षी सोनालीच्या घरी गणरायाचं आगमन होतं. सोनाली स्वत: तिच्या हाताने बाप्पाची सुंदर मूर्ती घडवते. यंदाही तिने घडवलेली गणरायाची मूर्ती खूपच खास आहे.