Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय मोने, समीर चौगुले आणि अरुण कदम सिनेमात एकत्र… रसिकांसाठी मनोरंजनाची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 15:54 IST

विनोदवीर कलाकारांची फौज एका सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अभिनेता संजय मोने, समीर चौगुले आणि अरुण कदम एकत्र येत आहेत.

विनोदवीर एकत्र आले की रसिकांसाठी धम्माल मनोरंजनाची मेजवानीच असते. आपल्या अभिनयासह अचूक कॉमेडीच्या टायमिंगच्या जोरावर विनोदवीर अभिनेता रसिकांचं तुफान मनोरंजन करतात. एकाच सिनेमात तीन तीन विनोदाचे बादशाह आणि अभिनयसंपन्न कलाकार एकत्र येतात तेव्हा रसिकांसाठी तर धम्माल मस्ती म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आता विनोदवीर कलाकारांची फौज एका सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहे.

 

या सिनेमात अभिनेता संजय मोने, समीर चौगुले आणि अरुण कदम एकत्र येत आहेत. या सिनेमाचं कोल्हापुरात शुटिंग सुरू असल्याची माहिती अभिनेता समीर चौगुले यांनी सोशल मीडिया अकाऊंट फेसबुकवर दिली आहे. मात्र सिनेमाचं नाव, सिनेमाचा विषय, कथा याबाबत कोणतीही माहिती समीर चौगुले यांनी दिलेली नाही.मात्र आजवरील समीर चौगुले यांचा अभिनय प्रवास पाहता हा सिनेमा नक्कीच रसिकांचं धम्माल मनोरंजन करणारा असेल यांत शंका नाही.तसेच चौगुले यांनी संजय मोने आणि अरुण कदम यांच्यासोबतचा एक सेल्फीसुद्धा फेसबुकवर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये समीर चौगुले यांनी संजय मोने आणि अरुण कदम यांचं तोंडभरुन कौतुक केले आहे. “संजय मोने गुरूजींसह काम करणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो” असं चौगुले यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. तसंच “सोबत अरुण कदम नावाचा अवलिया असेन तर कामात एक बहार असते” असं चौगुले यांनी म्हटले आहे. या तिघांच्या या सेल्फीला रसिकांकडून कमेंट्स आणि लाइक्स मिळत आहेत. 

आपला हजरजबाबी अभिनय आणि कॉमेडीमुळे रसिकांना हसून हसून लोटपोट करण्याचे काम कॉमेडी कलाकार करत असतात.अशाच कॉमेडी कलाकारांमध्ये नाव घ्यावे लागेल ते अभिनेता समीर चौगुले यांचं. छोट्या पडद्यावरील विविध मालिका,सिनेमा आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून समीर चौघुले यांनी रसिकांचं मनोरंजन केलं आहे. 'फू बाई फू','कॉमेडीची बुलेट ट्रेन' या शोच्या माध्यमातून समीर चौगुले हे नाव तर घराघरात पोहचले आहे.विविध नाटकांमध्येही वैविध्यपूर्ण भूमिका साकारत समीर चौगुले यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत.