Join us  

रिंकू राजगुरू सांगतेय, माझ्या गावातील लोकांमध्ये आणि फॅन्समध्ये आहे हा मोठा फरक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 6:30 PM

रिंकूला पहिल्याच चित्रपटात मिळालेली लोकप्रियता अनेकांना अनेक चित्रपटानंतर देखील अनुभवता येत नाही असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

ठळक मुद्देमाझे फॅन्स मला भेटायला येतात, फोटो काढतात आणि काहीही न बोलता निघून जातात. पण माझ्या गावातील लोक खूप वेगळे आहेत. ते माझ्याशी येऊन बोलतात, मला आशीर्वाद देतात, माझे कसे काय सुरू आहे हे विचारतात, माझ्यासाठी घरात बनवलेल्या गोष्टी आणून देतात.

सैराट या पहिल्याच चित्रपटामुळे रिंकू राजगुरू स्टार बनली. तिला केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभर लोकप्रियता मिळाली. सैराट या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी देखील केले होते. रिंकूला एकाच चित्रपटामुळे प्रचंड स्टारडम मिळाले. तिच्या फॅन्सची संख्या प्रचंड आहे. तिला सैराटला मिळालेल्या लोकप्रियते नंतर घराच्या बाहरे पडणे देखील शक्य होत नाहीये. एवढेच काय तर शाळेत जाताना देखील लोक गर्दी करत असल्याने तिने शाळा सोडून प्रायव्हेट शिक्षण घेणे पसंत केले. रिंकूला पहिल्याच चित्रपटात मिळालेली लोकप्रियता अनेकांना अनेक चित्रपटानंतर देखील अनुभवता येत नाही असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

सैराटनंतर रिंकूचा कागर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात देखील रिंकूचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने द वीक या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिच्या स्टारडमविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. रिंकू सांगते, मला मिळालेले यश मला सांभाळून ठेवायचे आहे. प्रसिद्धीमुळे मी आजही अजिबात बदललेली नाहीये. मी आजही सगळ्यांशी पहिल्यांदा वागायचे, तसेच वागते. मी स्टारडमचा विचारच करत नाही असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मला लोक एखाद्या स्टारसारखे वागवतात त्यावेळी मला खूपच विचित्र वाटते. मी वयाने खूप लहान असून मला तसेच वागवा असे मी त्यांना सांगते. 

कागर या चित्रपटाचे चित्रीकरण तिच्या गावातच झाले होते. या अनुभवाविषयी द वीकशी बोलताना तिने सांगितले होते की, मी आणि मकरंद माने दोघेदेखी एकाच गावातील असल्याने अनेकजण आम्हाला दोघांना भेटायला यायचे. त्यामुळे खूपच गर्दी व्हायची. सैराट या चित्रपटानंतर माझे फॅन्स मला भेटायला येतात, फोटो काढतात आणि काहीही न बोलता निघून जातात. पण माझ्या गावातील लोक खूप वेगळे आहेत. ते माझ्याशी येऊन बोलतात, मला आशीर्वाद देतात, माझे कसे काय सुरू आहे हे विचारतात, माझ्यासाठी घरात बनवलेल्या गोष्टी आणून देतात. यामुळे मला प्रचंड आनंद होतो. 

टॅग्स :रिंकू राजगुरूसैराट 2कागर