Join us
Daily Top 2Weekly Top 5

सचिन तेंडुलकरने 'आता थांबायचं नाय' या मराठी सिनेमाचं केलं कौतुक, म्हणाला-

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 12:57 IST

सचिन तेंडुलकरने 'आता थांबायचं नाय' सिनेमा पाहून कौतुक केलंय. मास्टर ब्लास्टरची पोस्ट दिग्दर्शक शिवराज वायचळने शेअर केली

'आता थांबायचं नाय' हा २०२५ मध्ये रिलीज झालेला मराठी सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमाने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंच शिवाय बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. या सिनेमाचं दिग्दर्शन शिवराज वायचळने केलं होतं. २०१७ च्या बीएमसीच्या एका सत्य घटनेवर आधारित या कथेत मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांनी रात्रीच्या वर्गात प्रवेश करून दहावीची परीक्षा कशी पास केली, याची प्रेरणादायी कहाणी पाहायला मिळाली. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 'आता थांबायचं नाय' हा सिनेमा बघून कौतुक केलं.

सचिनने पाहिला 'आता थांबायचं नाय', म्हणाला-

सचिनने नुकतंच त्याच्या चाहत्यांसोबत प्रश्न उत्तरांचं एक सेशन केलं. यामध्ये एका चाहत्याने सचिनला प्रश्न केला की, 'तुम्ही सिनेमे किती बघता आणि तुमचा आवडता सिनेमा कोणता?', यावर सचिन उत्तर देताना म्हणाला, ''मी जसं वेळ मिळेल तसं सिनेमे बघतो. नुकतंच मी 3 BHK आणि आता थांबायचं नाय या सिनेमांचा आनंद घेतला'', अशा शब्दात सचिनने 'आता थांबायचं नाय' सिनेमा पाहून कौतुक केलं. ही पोस्ट 'आता थांबायचं नाय'चा दिग्दर्शक शिवराज वायचळने शेअर केली. ''सचिन तेंडुलकर सर, खूप खूप आभार. खूप भारी वाटतंय!'', अशा शब्दात शिवराजने त्याच्या भावना शेअर केल्या. 

‘आता थांबायचं नाय!’ सिनेमाचं मराठीपासून हिंदी सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कौतुक केलं. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळाला. या सिनेमात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, प्राजक्ता हनमघर, ओम भुतकर, पर्ण पेठे, किरण खोजे आणि श्रीकांत यादव यांसारखे कलाकार पाहायला मिळाले. सर्वांनी या सिनेमाचं खूप कौतुक केलं. शिवराज वायचळचा पहिलाच सिनेमा असूनही त्याच्या दिग्दर्शनाची लोकांनी स्तुती केली.

टॅग्स :सचिन तेंडुलकरभरत जाधवसिद्धार्थ जाधवआशुतोष गोवारिकर