आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणास बसले आहेत. मुंबईतील आझाद मैदान येथे मराठा समाजाने शुक्रवारपासून (२९ ऑगस्ट) पुन्हा आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील हजारो आंदोलक सहभागी झाले आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेला मराठा आंदोलकांचाही पाठिंबा मिळत असल्याचं दिसत आहे.
मराठा समाजाच्या आंदोलनाला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने पाठिंबा दिला आहे. रितेशने X अकाऊंटवरुन ट्वीट केलं आहे. "सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगेजी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे 🙏🏽.जय शिवराय, जय महाराष्ट्र 🙏🏽", असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत झगडणारच. मराठा आरक्षणाच्या लढ्यात गोळ्या घातल्या तरी विजयाशिवाय मागे हटणार नाही. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून कोणीही हलणार नाही, असा निर्धार मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी आझाद मैदान येथे व्यक्त केला. जाळपोळ, दगडफेक, अवाजवी गोंधळ तसेच मुंबईकरांना त्रास होणार नाही याची जबाबदारी प्रत्येक आंदोलकाची आहे. पुढील दिशा ठरविण्यासाठी समाजाच्या एकजुटीची गरज आहे, असे ते म्हणाले.