Join us
Daily Top 2Weekly Top 5

'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."

By ऋचा वझे | Updated: April 29, 2026 13:29 IST

'शिवबा' ते 'राजा शिवाजी' असा हा प्रवास, 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत रितेश देशमुखने सांगितली टायटलमागची गोष्ट

अभिनेता रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' बहुप्रतिक्षित सिनेमा दोन दिवसांनी प्रदर्शित होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा बनवायचा हे त्याचं स्वप्न होतं. सोबतच तो पहिल्यांदाच महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. दरम्यान सिनेमाचं नाव 'राजा शिवाजी' असंच का ठेवलं यामागेही एक गोष्ट आहे. टायटलमध्ये छत्रपती असा उल्लेख का नाही? याचंही उत्तर त्याने 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 

'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत रितेश देशमुख म्हणाला, "आम्ही या सिनेमासंबंधी जितके शीर्षक असतील ते सर्व आधीच नोंद करुन ठेवले होते. राजा शिवछत्रपती, शिवछत्रपती शिवाजी महाराज, फक्त छत्रपती शिवाजी असे सगळे टायटल रजिस्टर करुन ठेवलेत. महाराजांची संपूर्ण शौर्यगाथा  केवळ एका सिनेमातून दाखवता येऊच शकत नाही. त्यातील एक अंश घेऊन आम्ही सिनेमा बनवायचं ठरवलं. तो भाग कोणता घ्यायचा याचा विचार करणं गरजेचं होतं. त्यासाठी संपूर्ण इतिहासाचा अभ्यास केला. त्यानंतर कोणता भाग घ्यायचा ते ठरवलं. यापूर्वी अनेक कलाकार दिग्दर्शकांनी महाराजांवरची सिनेमा, मालिका, नाटक केलं. प्रत्येकाने आपापल्या परीने गोष्टीतील हायलाईट्स घेतले. पण आम्ही जेव्हा महाराजांबद्दल वाचलं तेव्हा कळलं की महाराजांचे सख्खे थोरले बंधू संभाजी महाराजांविषयी बऱ्याच लोकांना माहित नाही. त्यांच्याबद्दलची माहिती फार कुठे लिहिलेली नाही. त्यांचं नाव संभाजी महाराज होतं म्हणून छत्रपतींनी मुलाचं नाव संभाजीच ठेवलं हेही अनेकांना माहित नाही. संभाजी महाराज शिवाजी महाराजांपेक्षा ८ वर्ष मोठे होते. "

माझा राजा माझा अभिमान

तो पुढे म्हणाला, "एका कुटुंबाला १६३६ मध्ये माहुलीच्या तहावेळी पुणे सोडून कर्नाटकला जावं लागलं. सगळी जहागीर सोडून घोडे, बैलगाडीतून जावं लागलं. त्यांना पदावरुन काढलं गेलं. तेव्हा त्यांची भावना काय असेल? त्या काळात हे सगळं महाराज लहानपणी बघत होते. या गोष्टींचा त्यांच्यावर कसा परिणाम झाला हेही महत्वाचं आहे. त्यामुळे ही गोष्ट महाराजांची नसून संपूर्ण कुटुंबाची आहे. हा सगळा प्रवास घेऊन यामागे स्वराज्य उभं राहतंय, ही स्वराज्याची उभारणीही सिनेमात आहे. हा सगळा व्याप आपल्या परीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी अफजल खान वधानंतर शिवाजी महाराजांची सर्वांनी दखल घेतली. तोपर्यंत सर्वांना शहाजी राजेंचे पुत्र म्हणून शिवाजी महाराज माहित होते. तीच व्यक्ती जेव्हा राजा शिवाजी म्हणून समोर येते तो हा प्रवास आहे. ‘शिवबा’ ते ‘राजा शिवाजी’ असा हा प्रवास आहे. शिवाजी ते छत्रपती शिवाजी महाराज हा प्रवास पूर्ण वेगळा आहे तो यात नाही. म्हणून मी अतिशय नम्रपणे सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित हा 'राजा शिवाजी' सिनेमा आहे. टायटलमध्ये छत्रपती नाही म्हणून हा अवमान होत नाही. माझा राजा, आपला अभिमान आहे हा संदेश आम्ही देतोय. शिवाजी महाराज आपल्यासाठी देवच आहेत. आपण देवाला अनेकदा माझा विठ्ठल, माझा बाप्पा अशी आपली भावना असते. तसंच हे आहे."

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट

'राजा शिवाजी' १ मे रोजी महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होत आहे. या सिनेमात मराठी आणि हिंदीतील अनेक कलाकारांची फौज आहे. रितेश-जिनिलिया यांच्यासोबत महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते हे मराठी कलाकार आहेत. तर संजय दत्त, अभिषेक बच्चन, भाग्यश्री, फरदीन खान, विद्या बालन अशी हिंदी कलाकारांचीही मांदियाळी आहे. सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग सुरु झालं असून प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद पाहायला मिळतोय.

English
हिंदी सारांश
Web Title : Why 'Raja Shivaji'? Riteish Deshmukh Explains Title Choice

Web Summary : Riteish Deshmukh reveals why his film is titled 'Raja Shivaji,' not 'Chhatrapati Shivaji.' He emphasizes the film portrays Shivaji's journey and family's role in establishing Swarajya, focusing on his transformation before Afzal Khan's death. The film releases on Maharashtra Day.
टॅग्स :रितेश देशमुखराजा शिवाजी चित्रपटमराठी अभिनेताछत्रपती शिवाजी महाराज