Join us
Daily Top 2Weekly Top 5

रितेश-जिनिलिया कोल्हापुरात! 'राजा शिवाजी'च्या यशानंतर अंबाबाई चरणी नतमस्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 18:51 IST

'राजा शिवाजी'ला मिळणाऱ्या उदंड प्रतिसादानंतर, रितेश आणि जिनिलिया देशमुख यांनी करवीर निवासिनी आई अंबाबाईचे दर्शन घेतले.

अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखचा बहुप्रतिक्षित 'राजा शिवाजी' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या १० दिवसांत ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. या भव्य यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि पुढील शिवमय प्रवासाला आशीर्वाद मिळावा यासाठी रितेश आणि जिनिलिया देशमुख यांनी कोल्हापूरातील करवीर निवासिनी आई अंबाबाईचे दर्शन घेतले. रितेश आणि जिनिलिया यांची एक झलक पाहण्यासाठी मंदिर परिसरात चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.  गर्दी लक्षात घेता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि पोलिसांनी मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता.

अंबाबाई मंदिरात सपत्नीक पूजा अर्चा केल्यानंतर रितेश देशमुखनं माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तो भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.  रितेश म्हणाला, "अंबाबाई देवीच्या आशीर्वादानेच आपण पुढं जातो. कोल्हापूरकरांनी जसं प्रेम माझे वडील स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यावर केलं, तसंच प्रेम आज मलाही मिळत आहे. मंदिरात आल्यावर जो शिवरायांचा जयघोष ऐकायला मिळतो, ती ऊर्जा शब्दांत मांडता येणार नाही".

'राजा शिवाजी' हा केवळ एक चित्रपट नसून महाराष्ट्राच्या इतिहासाचा, स्वराज्याच्या विचारांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा भव्य सिनेमॅटिक प्रवास आहे. या चित्रपटात रितेश देशमुखसोबत सलमान खान, अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन, भाग्यश्री आणि सचिन खेडेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांची फौज आहे. भव्य स्टारकास्ट आणि शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासामुळेच चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Riteish-Genelia visit Kolhapur after 'Raja Shivaji' success, seek blessings.

Web Summary : Ritesh and Genelia Deshmukh visited Kolhapur's Ambabai temple after 'Raja Shivaji's' success. The film crossed ₹50 crore in 10 days. Ritesh expressed gratitude for the blessings and love received, reminiscent of his father, Vilasrao Deshmukh.
टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजाकोल्हापूरराजा शिवाजी चित्रपट