Join us

रिंकू राजगुरुला लागली लॉटरी, दिसणार बॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्यासोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 15:48 IST

रिंकू राजगुरू सध्या एका प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत तिने शूटिंगला सुरूवात केल्याचे सांगितले होते. तसेच तिने सेटवरील तिचे फोटोदेखील इंस्टाग्रामवर शेअर केले होते. आता समजते आहे की, रिंकू बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमोल पालेकर यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे.

रिंकू राजगुरूने रविवारी म्हणजेच २१ मार्चला इंस्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा फोटो शेअर करत शूटिंगचा पहिला दिवस असल्याचे सांगितले होते.  रिंकू राजगुरू सध्या दिग्दर्शक सार्थक दासगुप्ता यांच्या प्रोजेक्टमध्ये काम करते आहे. सार्थक दासगुप्ता त्यांच्या सोशल मीडिया इंस्टाग्रामवर त्यांच्या शूटिंगचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.या प्रोजेक्टमध्ये तिच्यासोबत अमोल पालेकर दिसणार आहेत. अद्याप या प्रोजेक्टबद्दल जास्त माहिती मिळालेली नाही. मुंबईतील लाइमलाइट स्टुडिओत हे शूटिंग पार पडत आहे. सार्थक दासगुप्ता यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर रिंकू राजगुरूचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात ती कोर्टात बसलेली दिसते आहे.

तसेच त्यांनी इंस्टाग्रामवर अमोल पालेकर यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यात अमोल पालेकर यांचा गेटअप पाहून ते वकिलांची भूमिका साकारत असल्याचे समजते आहे.

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा अॅमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.

प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. तसेच रिंकू झुंड हिंदी चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

टॅग्स :रिंकू राजगुरूअमोल पालेकर