Join us

रघुजी भोसलेंची 'फिरंग' तलवार लंडनहून मायदेशी! संतोष जुवेकरनं व्यक्त केला आनंद, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 13:27 IST

ऐतिहासिक वाघनख्यानंतर आता मराठा साम्राज्यातील आणखी एक मौलिक ठेव महाराष्ट्रात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वाघनख्यानंतर आता मराठा साम्राज्यातील आणखी एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव महाराष्ट्रात येणार आहे. नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार (Sword) लंडनमधून राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. ही तलवार राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे लंडनमध्ये (London) सुपूर्त करण्यात आली. पात्याच्या पाठीवर तळाशी 'श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा फिरंग' हा देवनागरी लेख सोन्याच्या पाण्याने लिहिलेला आहे. अठराशे सत्रामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने भोसल्यांचा खजिना लुटला होता, तेव्हा ही तलवार लंडनला नेल्याची शक्यता आहे. ही ऐतिहासिक तलवार लंडन येथील लिलावातून परत मिळवण्यात सरकारला यश आल्यानंतर संतोष जुवेकरनं आनंद व्यक्त केलाय.  संतोष जुवेकरनं पोस्ट शेअर करत लिहलं, "छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्याचे थोर सरदार आणि नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक रघुजी राजे भोसले यांची शौर्याची, अभिमानाची, मराठ्यांच्या वैभवाची ओळख असलेली तलवार अधिकृतरित्या लंडनहून परत आपल्या मातीत येत आहे! ही तलवार महाराष्ट्र सरकारने लिलावातून जिंकली असून आपला ऐतिहासिक वारसा मायदेशी परतत आहे. हा अभिमानाचा क्षण शक्य केल्याबद्दल माननीय माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र सरकारचं मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार! जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र", असं त्यानं म्हटलं. 

लंडनमधील लिलावात जिंकली, किंमत किती?

ऐतिहासिक दस्तऐवज असलेली सदर तलवार लिलावात निघाल्याचे वृत्त कळाल्यानंतर राज्य सरकारने एक मध्यस्थ उभा करुन या लिलावात शासनाने सहभाग घेतला व लिलाव जिंकला. त्यासाठी ४७.१५ लाख रुपये राज्य सरकार देणार आहे. ही तलवार मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. एकधारी पाते, सोन्याचे नक्षीकाम हे त्या तलवारीचे वैशिष्ट्य आहे. युरोपिय बनावटीचे पाते हे त्या काळात प्रसिद्ध होते. १६ ऑगस्टपर्यंत राजे रघुजी भोसलेंची ही तलवार मुंबईत दाखल होणार आहे.

टॅग्स :संतोष जुवेकरमराठालंडन