'टाइमपास' सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात जागा बनवणारा प्रथमेश परब मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रथमेशने छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याबाबत वक्तव्य केलं आहे. ऑन कॅमेरा प्रथमेशने त्यांची माफी मागितली आहे. लक्ष्मण उतेकर यांची मराठी सिनेसृष्टीत दखल घेतली गेली नाही, असं प्रथमेशने म्हटलं आहे.
प्रथमेशने नुकतीच महाराष्ट्र टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, "आमच्या सगळ्यांच्या वतीने मला त्यांना सॉरी म्हणायचं आहे. ते जेव्हा मराठीत आले होते तेव्हा त्यांना त्यांच्या सिनेमासाठी झगडावं लागलं होतं. त्याचं फ्रस्ट्रेशन मी बघितलं आहे. ते खूप वैतागले होते. मी कुठून आलोय, मी काय प्रकारचा सिनेमा केलाय...तुम्ही काय रेट देताय, कुठे विकताय....असं ते म्हणत होते. मी त्यांना भडकताना बघितलं आहे. त्यांच्यासाठी मला भारी वाटलं की त्यांनी छावा नावाचा सिनेमा केला आणि त्यांनी दाखवून दिलं. तो माणूस इतका स्ट्रगल करून आलाय. त्यांच्याकडे एक एक अशा स्टोरी आहेत".
"मुंबईत असताना ते हातात डबा घेऊन असेच फिरायचे. फोटोग्राफरकडे ते असिस्टंट म्हणून कामाला होते. ते मराठीत सिनेमा बनवायला आले. मराठीत जे काय सो कॉल्ड १ नंबर, २ नंबर, ३ नंबर असणारे लोक त्यांनी त्यांना उभं केलं नाही. ही फार वाईट गोष्ट आहे. आदित्य सरपोतदारने आपल्याकडे सिनेमे केले तसे आपण का नाही करू शकत. तेच लोक जाऊन मुंज्या बघत्यात...या दिग्दर्शकांचा आपण का वापर करून घेऊ शकत नाही. मला फार वाईट वाटतं की असे दिग्दर्शक आपण सोडतो आणि हिंदीला देतो. मग त्यांच्याकडे पण काही पर्याय राहत नाही. तुमच्याकडे बजेटच नसेल, तर मग कसे मोठे सिनेमे करणार?", असंही तो म्हणाला.
प्रथमेश पुढे खंत व्यक्त करत म्हणाला, "आज छावा मराठीत रिलीज झाला असता तर? आपल्याला किती फायदा झाला असता. मुंज्या तर मराठीत होऊच शकला असता. पण, बजेमुळे झाला नाही. त्याने झोंबिवली नावाचा सिनेमा केला. पण तो लोकांनी पाहिला का? असे दिग्दर्शक आपल्या हातातून सुटतात. हे लेखक, दिग्दर्शक आपण जपले पाहिजेत. ही मोठी माणसं आहेत हे कळलं पाहिजे. साऊथवाले सगळ्यांना जपून ठेवतात. ओटीटीवर सगळे सिनेमे साऊथचे चाललेत. लक्ष्मण उतेकरांसाठी मला वाईट वाटतं. ते इतके मोठे दिग्दर्शक आहेत. त्यांच्यासाठी पैसे लावले पाहिजेत. आपल्याकडे बजेट आलं तर हे चांगले लोक आपल्याकडे राहतील. याचा विचार केला पाहिजे".