दगडू परब...अशा नावाचा हिरो मराठी सिनेमात आला आणि भाव खाऊन गेला. 'टाईमपास' सिनेमात अभिनेता प्रथमेश परबने (Prathamesh Parab) दगडू ही भूमिका साकारली होती. हा सिनेम प्रचंड लोकप्रिय झाला. लोकप्रियतेच्या बाबतीत 'सैराट' नंतर या सिनेमाचं नाव घेता येईल. प्रथमेश आणि केतकी माटेगावकर यांची कॉलेज काळातील लव्हस्टोरी, आईवडिलांचा विरोध हे सगळंच प्रेक्षकांना आपलंसं करुन जाणारं होतं. मात्र नंतर प्रथमेशला सतत याच धाटणीच्या भूमिका मिळायला लागल्या. यासंदर्भात त्याने मत मांडलं आहे.
'मुंबई टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत प्रथमेश परब म्हणाला, "मला एकाच धाटणीच्या भूमिका करायच्या नाहीत. मी ते टाळतोय. तसंच अडल्ट जोक करणारी भूमिकेलाही मी नाही म्हणतो. दगडू सारखं पात्रही मी थेट नाकारतो. कारण मला सतत तेच करायचं नाही. टाईमपास, टकाटक हे सिनेमे केल्यानंतर त्याच धाटणीच्या भूमिका ऑफर होऊ लागल्या. दगडू ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात आहे त्यामुळे आता मी ती ब्रेक करु शकत नाही. पण यापुढे सिनेमा निवडणं माझ्या हातात आहे."
तो पुढे म्हणाला, "भरत जाधव, सिद्धार्थ जाधव हे माझे आदर्श आहेत. त्यांनी चौकटीत न राहता वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. मीही तोच प्रयत्न करत आहे. मधल्या काळात माझे आधीपेक्षा काही वेगळे सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. मी चोखंदळपणे सिनेमा निवडला नसता तर दर माझे सात-आठ सिनेमे प्रदर्शित झाले असते."
प्रथमेशचा 'गाडी नंबर १७६०' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये प्रियदर्शिनी इंदलकर, शुभंकर तावडे, प्रसाद खांडेकर यांची भूमिका आहे. आता लवकरच प्रथमेश हिंदी सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 'पॉडर' असं सिनेमाचं नाव आहे. याआधी तो 'दृश्यम','दृश्यम २' या सिनेमांमध्येही दिसला. 'ताजा खबर' या वेबसीरिजमध्येही तो झळकला.