भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) ही मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने मराठी-हिंदी चित्रपटांसोबतच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही काम केले आहे. भाग्यश्रीने २०२२ साली मेकअप आर्टिस्ट विजय पलांडेसोबत साखरपुडा केला होता. मात्र काही दिवसानंतर ते वेगळे झाले. हे खुद्द अभिनेत्रीनेच पोस्ट शेअर करत सांगितले होते. दरम्यान आता तिने एका मुलाखतीत या नात्यावर भाष्य केले आहे.
भाग्यश्री मोटे हिने नुकतेच सुमन म्युझिकला मुलाखत दिली. त्यावेळी तिने तिच्या मोडलेल्या साखरपुड्याबद्दल सांगितले. ती म्हणाली की, ''बऱ्याच लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं. कारण ते सेलिब्रेशन असं दिसलं होतं तर ती पूजा होती. त्याच्यामुळे कदाचित त्या साडीमुळे लोकांना त्या लूकमुळे पण नाही ती फक्त एंगेजमेंट होती. साखरपुडा झाला होता जो मोडला. मी लग्नाचा विचार करणार आहे.''
''मी कोणाला दोष देत नाही..''
ती पुढे म्हणाली की, ''नक्कीच माझा प्रेमावर तर विश्वास आहे आणि मला मुलं हवी आहेत. मला मुलं आवडतात. म्हणजे मला माझ्या बहिणीची मुलं इतकी आवडतात. पण मला तसा योग्य पार्टनर हवाय त्यानंतर मी जाऊन विचार करेल. दररोज तुम्हाला निवड करावी लागते. तुम्ही सगळं सोडून नाही करू शकत. आता तो विश्वास डळमळल्यासारखं वाटतं मला कदाचित काही घटना आणि ज्या पद्धतीने गोष्टी झाल्या घडल्या. नशिबाचाही भाग होता तो. परत मी कोणाला दोष देत नाही. माझा स्वभावच नाहीये तो कधी की कोणाला दोष द्यावा.''