Join us

"भारताने जगाला कडक संदेश दिला" सोफिया कुरेशींच्या नेतृत्वावर मराठी अभिनेत्याची गौरवपूर्ण प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 13:26 IST

'ऑपरेशन सिंदूर'नंतर देशभरात भारतीय लष्कराचं आणि विशेषतः महिला अधिकाऱ्यांचं कौतुक होत आहे

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर अखेर भारतीय सेनेनं बदला घेतला. पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ तळं उद्ध्वस्त करून 'ऑपरेशन सिंदूर'  ही मोहीम फत्ते केली. ऑपरेशन सिंदूरनंतर लष्कराकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासोबत भारताने केलेल्या संपूर्ण कारवाईची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांनी दिली. या मोहिमेनंतर देशभरात अभिमान आणि प्रेरणेची लाट उसळली असून, अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर, मराठी अभिनेता हेमंत ढोमेने पोस्ट शेअर करत भारतीय लष्करातील नारीशक्तीचं विशेष कौतुक केलं आहे. "भारताने आज जगाला एक अत्यंत कडक संदेश दिला! 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल माहिती देताना कर्नल सोफिया कुरेशी. अत्यंत अभिमानास्पद! जयहिंद जय भारत". योसाबतच आणखी एका ट्विटमध्ये त्याने लिहलं, "त्यांच्या पाठीत पोलाद आणि हृदयात कर्तव्य. भारत गर्वाने उभा आहे. ही केवळ पत्रकार परिषद नाही, तर  हे भारताच्या दृढनिश्चयाचे प्रतिक आहे. धैर्याला लिंग नसते आणि सेवेला सीमा नसते", या शब्दात भारतीय लष्कराबाबत असलेला अभिमान व्यक्त केला. हेमंत ढोमेसारख्या कलाकारांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे समाजात लष्कर आणि नारीशक्तीबद्दलचं भान आणि अभिमान अधिक दृढ होताना दिसतो. सोशल मीडियावरही #OperationSindoor ट्रेंड करत आहे.

भारतीय लष्करात अनेक धाडसी महिला काम करत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी. त्या फक्त एक अधिकारी नाहीत, तर लाखो महिलांसाठी प्रेरणा ठरल्या आहेत. लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय लष्कराच्या सिग्नल कॉर्प्सच्या अधिकारी आहेत. २००६ मध्ये काँगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेतही काम केले आहे. कर्नल कुरेशी या गुजरातच्या रहिवासी आहेत, त्यांचे शिक्षण बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी आहे. महत्वाचे म्हणजे सोफिया यांचे पती देखील सैन्यात मेजर आहेत. मेजर ताजुद्दीन कुरेशी हे लष्कराच्या मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमध्ये सेवा बजावत आहेत. या दोघांना नऊ वर्षांचा मुलगा आहे. सोफिया कुरेशी यांची कौटुंबीक पार्श्वभूमी देखील लष्करी आहे. त्यांचे आजोबा भारतीय सैन्यात होते आणि त्यांच्या वडिलांनीही काही काळ सैन्यात सेवा बजावली आहे.

दरम्यान, 'ऑपरेशन सिंदूर' मोहिमेने दहशतवाद्यांना स्पष्ट संदेश दिला, की भारत शांततेचा पाठीराखा आहे, पण दुर्बल नाही. या संदेशात जेव्हा नारीशक्तीचा आवाज सामील होतो, तेव्हा तो केवळ संदेश राहात नाही, तर एक प्रेरणा बनते. आजच्या काळात "नारीशक्ती" हा केवळ एक शब्द नाही, तर ती भारताच्या प्रत्येक क्षेत्रात दिसणारी जिद्द आणि आत्मविश्वास आहे. 

टॅग्स :Hemant Dhome Today Newsऑपरेशन सिंदूर