गेल्या काही दिवसांपासून प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित आणि अभिनीत 'सरसेनापती हंबीरराव मोहिते' (Sarsenapati Hambirrao Mohite) चित्रपटाची खूप चर्चा होते आहे. या चित्रपटासंदर्भातील बरेच किस्से ऐकायला मिळत आहेत. त्यातीलच एक आश्चर्य वाटेल अशी बाब समोर आली आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांना यातील कलाकारांना नव्हे तर दुसऱ्याच कोणालातरी सर्वाधिक मानधन द्यावे लागल्याचे समोर आले आहे.
शिवाजी महाराजांच्या नेतृत्वातील सरसेनापती यांची शौर्यगाथा सरसेनापती हंबीरराव मोहिते या सिनेमात मांडण्यात आली आहे. यानिमित्ताने संवाद साधताना अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी काही रंजक किस्से सांगितले. या गप्पांमध्ये अर्थातच उल्लेख आला तो या चित्रपटातील कलाकारांच्या मानधनाचा. सरसेनापती चित्रपटातील प्रत्येक गोष्ट ही दर्जेदारच आहे असं सांगताना प्रवीण तरडे यांनी ऐतिहासिक चित्रपटाचे गणितच मांडले आहे. ऐतिहासिक सिनेमाचा विषय, मांडणी, कलाकार यापेक्षाही अशा चित्रपटाचे बजेट हाच खरा ऐतिहासिक चित्रपटाचा हिरो असतो आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते या चित्रपटात बजेटवर हात आखडता न घेतल्यानेच त्याची भव्यता दिसते असे प्रवीण तरडे यांनी सांगितले.