Join us  

अरे व्वा...! 'वेडिंगचा शिनेमा'ची परदेशवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 8:00 AM

'वेडिंगचा शिनेमा' नुकताच महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून आता भारतासह अमेरिका, इंग्लंड, दुबई, बेहरीन, जर्मनी, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

संगीतकार व गायक डॉ. सलील कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला बहुचर्चित 'वेडिंगचा शिनेमा' हा चित्रपट नुकताच महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली दाद मिळत आहे. प्री वेडिंगच्या ट्रेंडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या वेडिंगचा शिनेमा या चित्रपटाची हाताळणी लोकांच्या पसंतीस पडत आहे.

मराठी चित्रपटप्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे 'वेडिंगचा शिनेमा' चित्रपट महाराष्ट्रातच नव्हे तर आता परदेशातही प्रदर्शित करण्यात आला आहे. अमेरिका, इंग्लंड, दुबई, बेहरीन, जर्मनी, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये या चित्रपटाचे शो दाखविण्यात येत आहेत. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती गेरूआ प्रॉडक्शन्स आणि पीइएसबीने केली आहे.

हलक्या-फुलक्या अंगाने फुलत जाणारा हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. महानगरांमध्ये व मोठ्या शहरांमध्ये परस्पर नात्यांकडे कसे पहिले जाते आणि त्या तुलनेत छोट्या शहरांमध्ये त्याचे काय महत्व असते, याचा उलगडा या प्री-वेडिंग चित्रपटातून करण्यात आला आहे. 

'वेडिंगचा शिनेमा' चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे, शिवाजी साटम, अलका कुबल, कॉमेडीचा बादशहा भाऊ कदम आणि लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे, सुनील बर्वे यांच्याबरोबर अश्विनी काळसेकर, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे, शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा सलील कुलकर्णी यांनी लिहिली असून पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शनाची जबाबदारीदेखील यशस्वीरित्या पार पडली आहे.

चित्रपट प्रेमींचे मी प्रथम आभार मानतो, त्यांच्या प्रतिसादामुळे आणि प्रेमामुळे मी इथपर्यंत मजल मारली आहे अशी भावना दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, 'मी पहिल्यांदाच दिग्दर्शित केलेल्या माझ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. याचे मला खूप समाधान वाटत आहे. चित्रपटातील सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. मला वाटते की चित्रपटाची कथा आजची असावी. तसेच प्रत्येकाला रुचेल आणि पटेल अशी असावी, याकडे माझा जास्त कल होता. स्वप्नाळू किंवा काहीतरी भयंकर करण्यापेक्षा आपल्यासारख्या माणसांमध्ये, घरांमध्ये घडणाऱ्या गोष्टी पाहणे, यात खरी मजा आहे. आणि तेच मी यामध्ये दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.'

तर मुक्ता बर्वेने सांगितले की, ''वेडिंगचा शिनेमा' चित्रपटाची कथा मजेशीर व हलकीफुलकी असून मराठीत अशाप्रकारचा वेगळा बाज क्वचितच हाताळला गेला आहे. यातील माझी दिग्दर्शिकेची भूमिका खूपच वेगळी असून त्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे, याचा मला खरच आनंद झाला आहे. '

टॅग्स :वेडिंग चा शिनेमासलील कुलकर्णीमुक्ता बर्वेअलका कुबलशिवाजी साटम