Join us

नोटा बंदीचा मराठी चित्रपटसृष्टीला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 17:21 IST

      priyanka londheकेवळ बॉलिवूडच नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीला देखील हजार पाचशेच्या नोटा बंदीचा चांगलाच फटका बसल्याचे दिसून ...

      priyanka londheकेवळ बॉलिवूडच नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीला देखील हजार पाचशेच्या नोटा बंदीचा चांगलाच फटका बसल्याचे दिसून येत आहे. याचा सर्वाधिक मोठा परिणाम म्हणजे मराठी चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन घटले आहे. इतकेच नाही तर अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण देखील पुढे ढकलल्याचे समजले आहे. प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या काही मराठी चित्रपटांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. यामुद्द्यावर लोकमत सीएनएक्सने मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी संवाद साधत   या नोटा बंदीचा परिणाम काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 'फुगे' या चित्रपटाची सगळीकडेच जोरदार चर्चा सुरु होती. हा चित्रपट २ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. नोटा बदलाचा या चित्रपटाला फटका बसू नये यासाठी या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले असल्याचे समजतेय. चित्रपट प्रदर्शनाची तारीख अजूनही जाहीर करण्यात आली नाही. जानेवारीत हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. तसेच उपेंद्र लिमये यांचा 'क्षितीज' हा सिनेमा देखील ९ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. या चित्रपटाचे प्रदर्शन देखील आता लांबणीवर पडले असल्याचे समजतेय.'रॉकऑन' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला नोटा बंदीचा फटका बसला. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर म्हणावे तितके चांगले ओपनिंग मिळाले नाही. काही चित्रपटगृहांमधून हा चित्रपट उतरविण्यात देखील आला होता. चित्रपटांच्या चित्रीकरणावर देखील नोटा बंदीचा परिणाम झाल्याचे समजतेय. अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आल्याचे कळतेय. संतोष जुवेकर याच्या 'राजन' या चित्रपटाचे चित्रीकरण काही दिवसातच सुरु होणार होते. आता या चित्रपटाचे शूटिंग २० ते २५ दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. असे अनेक चित्रपटांच्या बाबतीत झाले आहे. तर अनेक नाटकांचे प्रयोगदेखील रद्द करण्यात येतायेत. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीला  नोटा बंदीची झळ सोसावी लागत असल्याचेच दिसत आहे. हजार-पाचशेच्या नोटांमुळेच आम्ही फुगे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकललेले आहे. प्रेक्षकांनी सध्या चित्रपटगृहांकडे पाठ फिरवल्याचेच पहायला मिळतेय. आता आलिया भट्टचा 'डिअर जिंदगी' हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच आम्हाला काही अंदाज येऊ शकतो. या चित्रपटावरूनच समजेल की प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी थिएटर्समध्ये येत आहेत का? प्रेक्षक सिनेमा पाहायला जायला लागल्याचे समजताच आम्ही हा चित्रपट प्रदर्शित करु.                                                           अर्जुन बरन (निर्माते, फुगे)नोटाबंदीचा परिणाम नाटकांवर नक्कीच झाला आहे. प्रेक्षकांची संख्या थोडीशी कमी झाली आहे. पैसे कसे दयायचे हा प्रश्न लोकांपुढे आहे. परंतु 'आम्ही अमर फोटो स्टुडिओ'साठी प्रेक्षकांना पर्याय दिला होता. आम्ही जाहिरातीत लिहीलं होत. आज नाटक पाहायला या पैसे उदया दिले तरी चालतील. चेक आणि डेबिट कार्डची सोय सुद्धा केली होती. त्यामुळे आमच्या या नाटकाचे प्रयोग चांगले गेले आहेत असे मी म्हणेल. बाकी सांगायचे तर नोटांबदीचा नक्कीच परिणाम झाला आहे. कारण थिएटरवाल्यांना कॅश पेमेंट करावा लागतो. परंतु त्यांना आता चेक घेण्यासाठी राजी करावे लागत आहेत. त्यामुळे या नोटाबंदीचा नक्कीच परिणाम झाला असे म्हणू शकतो.                                                             सुनिल बर्वे (निर्माता, अमर फोटो स्टुडिओ)लोकांनी चित्रपटगृहाकडे पाठ फिरवणे ही गोष्ट केवळ काही नैसर्गिक आपत्ती, अथवा दंगल, युद्ध झाल्यासच घडते. पण 500 आणि 1000 च्या नोटा बदलल्यानंतर लोकांकडे हातात पैसाच नाहीये. त्यामुळे लोक चित्रपटगृहातच जातच नाहीत. लोक त्यांच्या आवश्यक गोष्टींसाठीच केवळ पैसा खर्च करत आहे. ही परिस्थिती आणखी काही दिवस तरी अशीच राहाणार आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीसाठी हा अतिशय वाईट काळ आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन यावर विचार करण्याची गरज आहे.                                                              अर्जुन रामपाल (अभिनेता )नोटा बंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान रिलीज होणाऱ्या चित्रपटांच्या तारखा पुढे ढकलणे योग्य राहिल असे मला वाटते. कारण 30 डिसेंबरनंतर ही परिस्थिती थोडी बदलेल असा मला विश्वास आहे. असे ते एका प्रेस रिलीज मध्ये म्हणालेत.                                                           पंकज निहलानी ( सेन्सॉर बोर्ड प्रमुख )