Join us
Daily Top 2Weekly Top 5

'नाळ' फेम श्रीनिवास पोकळेच्या 'निबंध' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 21:56 IST

'निबंध' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'निबंध' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मा अनसूया फिल्म्स एल एल पी निर्मित आणि हेमंत नागपुरे प्रस्तुत 'निबंध' या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले व अनिल वी. कुमार यांच्या हस्ते गोरेगाव येथील चित्रनगरीमध्ये संपन्न झाला. निर्माते तेजस्विनी नागपूरे, अशोक ब. खोडे, प्रेझेंटर हेमंत नागपुरे, दिग्दर्शक संजीव मोरे, कलाकार अजित देवळे, देवेन्द्र घोडके, सिध्दार्थ बडवे,  अणि बाल कलाकार श्रीनिवासन पोकळे, अथर्व देवान, अर्णव नागपुरे हे मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.

दिग्दर्शक संजीव मोरे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटात शीर्षकाला अनुसरून शालेय जीवनावर आधारीत कथानक पहायला मिळणार आहे. शाळेत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांच्या अतूट मैत्रीची कथा सांगणारा 'निबंध' हा चित्रपट आजच्या काळातील शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा आहे. शाळेचे संस्थापक रिटायर्ड मेजर यांच्या परिश्रमपूर्वक संस्कारातून आणि शिक्षणातून घडलेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांच्या चाणाक्ष बुद्धीकौशल्यातून लिहिल्या गेलेल्या निबंधातून समाजव्यवस्था आणि शासकीय कारभारावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न 'निबंध' या चित्रपटाद्वारे करण्यात येणार आहे.

'निबंध'ची कथा दिग्दर्शक संजीव मोरे यांनीच लिहीली असून, त्यांचा दिग्दर्शक म्हणून हा चौथा चित्रपट आहे. गीत- पटकथा व संवादलेखन राजेश ढवळे यांनी केलं असून  संगीत आहे अशोक दिवाण यांचे, डीओपी सुजित विश्वकर्मा आणि शोधन चौहान यांच्या नजरेतून 'निबंध'ची कथा कॅमेऱ्यात कैद होणार आहे. 'नाळ' या गाजलेल्या चित्रपटातील 'चैत्या' म्हणजेच श्रीनिवास पोकळे या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून, त्यासोबत अथर्व देवान, अर्णव नागपुरे, सायली देठे, देवेंद्र घोडके, सिध्दार्थ बडवे, प्रशांत कक्कड, अभय देशमुख, वत्सला पोलकमवार, शेखर डोंगरे, के. आत्माराम आदी कलाकार आहेत.

'निबंध' या मराठी चित्रपटाचे गडचिरोली जिल्ह्य़ातील परीसरात चित्रीकरण सुरू होत असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून हसत-खेळत समाजापर्यंत एक संदेश पोहोचवण्याचं काम 'निबंध' हा सिनेमा निश्चित करेल असा विश्वास प्रस्तुत हेमंत नागपुरे आणि निर्माते तेजस्विनी नागपूरे, अशोक ब. खोडे  यांना आहे.

टॅग्स :नाळ