Join us  

बहुप्रतिक्षित ‘मुळशी पॅटर्न’ आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 7:15 AM

अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांची वास्तवाला स्पर्श करणारी लेखणी, तगड्या कलाकारांची मोठी फळी आणि उत्तम सादरीकरण अशी अनेक वैशिष्ट्ये असलेला ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

ठळक मुद्दे‘मुळशी पॅटर्न’ ही गोष्ट केवळ एका मुळशी तालुक्याची नसून संपूर्ण देशाची आहेचित्रपटाची गीते प्रणित कुलकर्णी यांची असून संगीत नरेंद्र भिडे यांनी दिले आहे

समाजाचे वास्तव पडद्यावर मांडणाऱ्या अनेक कलाकृती आजवर पडद्यावर आल्या, मात्र थेट खोलात जाऊन समस्येचे मूळ शोधत त्यावर सामाजिक संदेश देणारा ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपट हा आजवर बनलेल्या सर्व कलाकृतींपेक्षा हटके आहे. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांची वास्तवाला स्पर्श करणारी लेखणी, तगड्या कलाकारांची मोठी फळी आणि उत्तम सादरीकरण अशी अनेक वैशिष्ट्ये असलेला ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

‘मुळशी पॅटर्न’ ही गोष्ट केवळ एका मुळशी तालुक्याची नसून संपूर्ण देशाची आहे. महात्मा गांधी यांचा ‘खेड्याकडे चला’ हा संदेश ‘खेडे सोडून चला’ असा घेतला गेला आणि शहरीकरणाला सुरुवात झाली. मोठ्या शहरात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या त्याबरोबर या शहरांचे बकालपण आणि गुन्हेगारी वाढत गेली. दोन – अडीच दशकांपूर्वी आलेल्या खासगीकरणाच्या धोरणाने आर्थिक विकासाला मोठी चालना मिळाली. यामुळे मोठ्या शहरांच्या आजूबाजूला मोठमोठ्या कंपन्या, एमआयडीसी उभ्या राहिल्या. परिणामी त्या भागातील शेत जमिनीचे भाव गगनाला भिडले, यातून शेतकरी अल्पावधीत श्रीमंत झाला, मात्र ही श्रीमंती फार काळ टिकली नाही. जमिनी विकलेल्या शेतकऱ्याच्या दुसऱ्या पिढीला याचे परिणाम भोगावे लागत आहेत, हा सामाजिक प्रश्न प्रविण विठ्ठल तरडे यांनी मांडला आहे.

अभिजित भोसले जेन्युईन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची निर्मिती असलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये अभिनेता ओम भूतकर, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, प्रविण विठ्ठल तरडे, सविता मालपेकर, सुनील अभ्यंकर, क्षितीश दाते, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, सुरेश विश्वकर्मा, दीप्ती धोत्रे, मिलिंद दास्ताने, अजय पुरकर, जयेश संघवी, अक्षय टंकसाळे, बालकलाकार आर्यन शिंदे अशी उत्तम कलाकारांची मांदियाळी चित्रपटात आहे. तर मालविका गायकवाडच्या रूपाने मराठी इंडस्ट्रीला एका नवा चेहरा मिळाला आहे.

चित्रपटाची गीते प्रणित कुलकर्णी यांची असून संगीत नरेंद्र भिडे यांनी दिले आहे. नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांचे तर छायाचित्रण महेश लिमये यांनी केले आहे. चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एल. एल. पी. आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन आहेत. 

टॅग्स :मुळशी पॅटर्नमोहन जोशीउपेंद्र लिमये महेश मांजरेकर